चेन्नई: यंदाच्या T20 वर्ल्ड कप 2022 ची टीम इंडियाने जोरदार तयारी केली होती. कित्येक महिने आधीपासून हा वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवून टीम इंडियाच्या मालिका आयोजित करण्यात आल्या होत्या. पण सेमीफायनलमध्ये इंग्लंडकडून पराभव झाल्यानंतर टीम इंडियाच आव्हान संपुष्टात आलं. भविष्यात अशी स्थिती पुन्हा उदभवू नये, यासाठी अनिल कुंबळे यांनी एक महत्त्वाचा सल्ला दिलाय.
अनिल कुंबळे काय म्हणाले?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुढे जाताना, लिमिटेड ओव्हर्स आणि टेस्ट फॉर्मेटच्या टीम्स पूर्णपणे वेगळ्या असल्या पाहिजेत, असं अनिल कुंबळे यांचं मत आहे. ते टीम इंडियाचे माजी कोच आहेत. विराट कोहली बरोबर मतभेद झाल्यानंतर त्यांनी कोच पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्याजागी रवी शास्त्री यांनी कोचपदाची जबाबदारी संभाळली होती.
T20 मध्ये तुम्हाला स्पेशलिस्टची गरज
वनडे आणि टी 20 मध्ये इंग्लंडच यश पाहिल्यानंतर टेस्ट आणि लिमिटेड ओव्हर्स क्रिकेटसाठी वेगवेगळ्या टीम्सची चर्चा सुरु झालीय. “निश्चितच, तुम्हाला दोन वेगवेगळ्या टीम्सची गरज भासेल. T20 मध्ये तुम्हाला स्पेशलिस्टची गरज असते. त्यांच्या फलंदाजी क्रमवारीवरुन तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल” असं अनिल कुंबळे ESPNCricinfo ला दिलेल्या मुलाखतीत म्हणाले.
लिव्हिंगस्टोन 7 व्या नंबरवर येतो
“इंग्लंडकडून लियाम लिव्हिंगस्टोन सातव्या नंबरवर फलंदाजी करण्यासाठी येतो. कुठल्याही दुसऱ्या टीमकडे सातव्या नंबरवर लिव्हिंगस्टोनसारखा फलंदाज नाहीय. ऑस्ट्रेलियासाठी मार्कस स्टॉयनिस सहाव्या नंबरवर फलंदाजी करतो. तुम्हाला अशा प्रकारची टीम घडवावी लागेल” असं कुंबळे म्हणाले.
टॉम मुडी वेगवेगळ्या कोचसाठी आग्रही
“आंतरराष्ट्रीय टीम्सनी वेगवेगळे कोच ठेवण्यावर गांभीर्याने विचार केला पाहिजे” असं ऑस्ट्रेलियाचा माजी ऑलराऊंडर टॉम मुडी यांचं मत आहे. इंग्लंडकडे ब्रँडन मॅक्क्युलम टेस्ट टीमचे तर मॅथ्यू मोट लिमिटेड ओव्हरचे कोच आहेत.