मुंबई : टीम इंडियाचा खेळाडू मोहम्मद शमी याने वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेत सर्वांची मने जिंकली. यासोबतच तो वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय बॉलर ही बनला आहे. कठीण काळात तो टीमला विकेट मिळवून देत होता. ज्यामुळे संघ विजयापर्यंत पोहोचू शकला. देशासाठी खेळण्याची संधी मिळाली तर शेवटपर्यंत आपले सर्वस्व देऊन खेळायचे याचे जिवंत उदाहरण म्हणजे मोहम्मद शमी. विश्वचषकाच्या पहिल्या चार सामन्यांमधून बाहेर असूनही, सात सामन्यांमध्ये 24 विकेट घेणारा शमी 2015 च्या विश्वचषकात इंजेक्शन घेतल्यानंतर खेळला होता. आपली कारकीर्द पणाला लावून तो सामना संपल्यानंतर रुग्णालयात जाऊन उपचार घ्यायचा आणि त्यानंतर पुढच्या सामन्यासाठी सज्ज व्हायचा. खुद्द 33 वर्षीय वेगवान गोलंदाजाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
ऑस्ट्रेलिया संघाने रविवारी अहमदाबादमध्ये भारतावर सहा गडी राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा विश्वचषक ट्रॉफी जिंकली. 240 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने भारतावर विजय मिळवला आणि करोडो लोकांच्या इच्छा आणि अपेक्षांवर पाणी फेरले गेले. भारतीय संघाला मोहम्मद शमीने पहिल्याच चेंडूवर डेव्हिड वॉर्नरला बाद करून ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का दिला. या स्पर्धेत त्याने तीन वेळा पाच विकेट्स घेतल्या. शमीचा २०१५ पासूनचा प्रवास एखाद्या चित्रपटाच्या स्क्रिप्टसारखा राहिला आहे.
विश्वचषकानंतर माझ्या गुडघ्याचे ऑपरेशन झाले. मी दोन तास बेशुद्ध होतो. जेव्हा मी उठलो तेव्हा मी डॉक्टरांना विचारले की मी कधी खेळू शकतो. ते म्हणाले की, तुम्ही लंगडत न चालता चालायला सुरुवात केलीत तरी ती तुमच्यासाठी एक उपलब्धी असेल, खेळणे विसरून जा. हे सर्व तुम्ही किती लवकर बरे व्हाल यावर अवलंबून आहे.
शमी PUMA चा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. विश्वचषकानंतर बंगळुरूमध्ये दिलेल्या मुलाखतीत त्याने अनेक प्रश्नांची उत्तर दिली. शमी म्हणाला, ‘मला कोणत्या वेदना होत होत्या हे कोणालाच माहीत नव्हते. 2015 च्या स्पर्धेपूर्वी माझ्या गुडघ्याला सूज आली होती. माझ्यात वेदना सहन करण्याची क्षमता आहे आणि मला दोन पर्याय दिले गेले: शस्त्रक्रिया करा किंवा स्पर्धा खेळा. प्रत्येक सामन्यानंतर संघ हॉटेलमध्ये परतायचा, मी इंजेक्शन घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जात असे. जेव्हा तुम्ही देशासाठी खेळता तेव्हा तुम्ही सर्वकाही विसरता.’
2015 विश्वचषकानंतर शमीने शस्त्रक्रियेनंतर मागे वळून पाहिले नाही. त्याचा पुनरागमनाचा प्रवास प्रेरणादायी ठरला आहे. विश्वचषकाच्या १८ सामन्यांत ५५ बळी घेऊन तो जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्पर्धेत देशासाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज तर ठरलाच, पण उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध ७-५७ अशी सर्वोत्तम गोलंदाजी करून इतिहासही रचला.