मुंबई, 16 डिसेंबर | आयपीएल 2024 स्पर्धेचे ऑक्सन सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने चाहात्यांना धक्का देणारा निर्णय घेतला आहे. मुंबई इंडियन्सने कर्णधारपदावरुन रोहित शर्मा याला हटवले. हार्दिक पंड्या याला कर्णधार करण्याचा निर्णय शुक्रवारी जाहीर केला. या निर्णयाचा मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. रोहित शर्मा याचा मुंबई इंडियन्सला पाच वेळा जेतेपद मिळवून देण्यात मोठा वाटा राहिला. त्याला तडकाफडकी कर्णधारपदावरुन काढले. यामुळे मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्माचे समर्थक संतापले. हा निर्णय चाहत्यांच्या पचनी पडलेला नाही. त्यामुळे चाहत्यांनी मुंबई इंडियन्सला झटका देण्याचा निर्णय घेतला. सोशल मीडियावर मुंबई इंडियन्स अनफॉलो करण्याचा ट्रेंड सुरु झाला. निर्णयानंतर तासाभरात लाखो चाहत्यांनी मुंबई इंडियन्सची साथ सोडली आहे.
रोहित शर्मा 2013 पासून मुंबई इंडियन्स कर्णधारपद भूषवत होता. मागच्या दहा वर्षात सर्वात यशस्वी कर्णधारापैकी एक आहे. रोहित शर्मा याला हटवल्यानंतर सोशल मीडियावर X (ट्विटर) वर मुंबई इंडियन्सचे चाहते आपला संताप व्यक्त करत आहे. रोहित शर्मा याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर मुंबई इंडियन्सचे 4 लाख चाहते कमी झाले आहेत. तसेच इन्स्टाग्रामवर 1 लाख फॉलोअर्स कमी झाले आहेत. मुंबई इंडियन्सच्या अकाउंटवर व्हिडिओखाली चाहते अनफॉलो मुंबई इंडियन्स हा ट्रेंड चालवत आहे. एका चाहत्याने मुंबई इंडियन्सचा झेंडा आणि जर्सी जाळतानाचा फोटो शेअर केला आहे. दुसऱ्या एका युजरने लिहिले आहे आजपासून मी मुंबई इंडियन्सचा पाठिराखा नाही. सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. रोहित शर्मा याचे कर्णधारपद अपमानास्पद पद्धतीने काढण्यात आल्याचे काही जणांनी म्हटले आहे.
हार्दिक पंड्या याने 2015मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळण्यास सुरुवात केली. 2021 पर्यंत हार्दिक मुंबई इंडियन्सकडून खेळत होता. परंतु 2022 मध्ये गुजरात टाइटंससोबत हार्दिक गेला. त्याच्या नेतृत्वाखाली 2023 मध्ये गुजरात टीम अंतिम सामन्यापर्यंत पोहचली होती. 2024 पूर्वी हार्दिकने मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन केले. आता तो मुंबई इंडियन्सचा कर्णधार झाला आहे.