मुंबई : पुढचे काही दिवस भारतीय क्रिकेटसाठी खूप महत्वाचे आहेत. टीम इंडियात काही बदल दिसू शकतात. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. तीन महिन्यांनी वनडे वर्ल्ड कप होणार आहे. त्यानंतर हे बदल आणखी प्रकर्षाने दिसून येतील. अजित आगरकर यांचं नाव निवड समिती अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहे. त्यांनी अर्ज केला आहे. निवड समिती अध्यक्ष बनल्यानंतर अजित आगरकर यांना सर्वप्रथम काही कठोर निर्णय घ्यावे लागतील.
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड मागच्या काही दिवसांपासून सिलेक्शन कमिटीच्या पाचव्या सदस्यांची जागा भरण्याची प्रक्रिया पूर्ण करत आहे. चीफ सिलेक्टर बनणाऱ्या सदस्यालाच ही पाचवी जागा मिळेल. अजित आगरकर यांच्याकडे आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रिकेट खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यामुळे त्यांची या जागेवर निवड पक्की मानली जात आहे.
आगरकर यांच्यावर सर्वात पहिली जबाबदारी काय असेल ?
अजित आगरकर चीफ सिलेक्टर झाल्यानंतर त्यांच्यावर सर्वात मोठी जबाबदारी काय असेल? सर्वप्रथम आशिया कप आणि वर्ल्ड कपसाठी त्यांना दमदार टीम निवडावी लागेल. पण इथेच त्यांचं काम संपणार नाही. त्यानंतर खर काम सुरु होईल, ते म्हणजे भविष्याची टीम तयार करण्याचं.
वर्ल्ड कप संपल्यानंतर बनवणार रोड मॅप
वर्ल्ड कप संपल्यानंतर अजित आगरकर यांना रोहित शर्मा आणि विराट कोहली या दिग्गजांच्या भवितव्याचा निर्णय घ्यावा लागेल. वर्ल्ड कप 2023 नंतर सीनियर खेळाडूंशी बोलून भविष्याची योजना तयार करण्याच काम कराव लागेल. यात कॅप्टन रोहित शर्मा, रवींद्र जाडेजा, मोहम्मद शमी सारखे खेळाडू आहेत. इनसाइड स्पोर्ट्ने बीसीसीआय सूत्रांच्या हवाल्याने हे वृत्त दिलं आहे. या खेळाडूंना कुठला एक फॉर्मेट सोडायला सांगितला जाईल. जेणेकरुन नव्या खेळाडूंना संधी मिळेल.
वनडे वर्ल्ड कपनंतर सर्व लक्ष T20 वर
वनडे वर्ल्ड कप नंतर टीम इंडिया फोकस T20 क्रिकेटवर असेल. 2024 मध्ये T20 वर्ल्ड कप होणार आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीला 2022 T20 वर्ल्ड कप नंतर टीममध्ये संधी मिळालेली नाही. यापुढे त्यांना या फॉर्मेटमध्ये स्थान मिळण्याची शक्यता फारच कमी आहे.