मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधील पराभवानंतर आता आगामी वेस्ट इंडिज सीरीजची चर्चा सुरु झाली आहे. WTC फायनलमधील पराभव मागे सोडून टीम इंडिया आता वेस्ट इंडिजपासून नव्या सीजनला सुरुवात करणार आहे. ऑस्ट्रेलियाकडून झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर टीम इंडियात बदलाची मागणी जोर धरु लागली आहे. टीम इंडियातून काही सिनीयर खेळाडूंना वेस्ट इंडिज सीरीजसाठी डच्चू मिळू शकतो.
दरम्यान WTC च्या फायनलमध्ये कॅप्टन रोहित शर्मा आणि हेड कोच राहुल द्रविड यांच्या जोडीकडून टीम सिलेक्शनमध्ये काही चूका झाल्या होत्या. आगामी वेस्ट इंडिज सीरीजमध्येही तशाच चूका होण्याची शक्यता आहे.
द्रविड-रोहित जोडी पुन्हा तीच चूक करणार का?
इशान किशनला पुन्हा बेंचवर बसवून ठेवणार का? हाच प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. कारण केएस भरतच वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीममध्ये स्थान कायम राहणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे कॅप्टन रोहित शर्मा आणि कोच राहुल द्रविड कोणाला संधी देतात? ते पहाव लागेल.
त्याच स्थान कायम राहणार
क्रिकेबजच्या वृत्तानुसार, आंध्र प्रदेशच्या केएस भरतच टेस्ट टीममध्ये स्थान कायम राहणार आहे. येत्या 28 जूनपासून दुलीप ट्रॉफी स्पर्धा सुरु होणार आहे. त्यासाठी केएस भरतच साऊथ झोनच्या टीममध्ये निवड झाली आहे. मागच्यावर्षी वेस्ट झोन आणि साऊथ झोनची टीम फायनलमध्ये पोहोचली होती. यावेळी दोन्ही टीम थेट सेमीफायनलमध्ये पोहोचल्या आहेत.
कोणाला पसंती देतात, हे महत्वाच
इशान किशन सेंट्रल झोनच्या टीममधून खेळणार होता. पण आगामी वेस्ट इंडिजचा दौरा लक्षात घेऊन त्याने माघार घेतली. वेस्ट इंडिज विरुद्ध टीम इंडिया दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. यावेळी विकेटकीपर म्हणून कोच राहुल द्रविड आणि कॅप्टन रोहित शर्मा कोणाला पसंती देतात, हे महत्वाच आहे.
ऋषभ पंतच्या जागी तोच योग्य पर्याय
कारण केएस भरतला बरीच संधी मिळालीय. फेब्रुवारी महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेत त्यानंतर आता WTC फायनलमध्ये संधी दिली. पण अजून एकदाही त्याला प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. तो सपशेल अपयशी ठरला. त्याचवेळी इशान किशन अजूनही टेस्टमध्ये संधीच्या प्रतिक्षेत आहे. इशान किशन वनडे आणि T20 ला साजेशी फलंदाजी करु शकतो. ऋषभ पंतच्या जागी तोच योग्य पर्याय आहे. पण द्रविड-रोहित जोडीला आक्रमक विचार करण्याची गरज आहे.