मुंबई: आशिया कप (Asia cup) आधी टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. भारतीय संघाचे हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांना कोरोना व्हायरसची (Corona virus) लागण झाली आहे. ते आशिया कप स्पर्धेसाठी जाऊ शकतात की, नाही याबद्दल संशय आहे. टीम इंडिया आज यूएईसाठी रवाना होणार आहे. आशिया कप स्पर्धेची सुरुवात 27 ऑगस्टपासून होणार आहे. स्पर्धेतील भारताचा पहिला सामना 28 ऑगस्टला पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. रिपोर्ट्सननुसार, यूएईला रवाना होण्याआधी भारतीय कोच राहुल द्रविड यांची कोविड 19 चाचणी करण्यात आली होती. बीसीसीआयकडून कोणतही अधिकृत स्टेटमेंट समोर आलेलं नाही.
द्रविड आशिया कप स्पर्धेसाठी दुबईला जाऊ शकले नाहीत, तर त्या स्थितीत व्ही.व्ही.एस लक्ष्मण मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावतील. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख असलेले लक्ष्मण मागच्या तीन महिन्यांपासून टीम इंडिया सोबत आहेत. झिम्बाब्वे दौऱ्यावर ते संघाचे मुख्य प्रशिक्षक होते. भारताने झिम्बाब्वे विरुद्धच्या सीरीज मध्ये 3-0 असा एकतर्फी विजय मिळवला. राहुल द्रविड यांना आशिया कप आधी आराम देण्यात आला होता. झिम्बाब्वे दौऱ्यावर लक्ष्मण यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली होती. आशिया कप स्पर्धेआधी द्रविड कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट आल्याने चाहते निराश झाले आहेत.
वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेनंतर राहुल द्रविड यांनी ब्रेक घेतला होता. राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाची चांगली बांधणी झाली आहे. इंग्लंड मधील वनडे आणि टी 20 मालिका भारताने जिंकली. त्यानंतर वेस्ट इंडिज विरुद्ध वनडे आणि टी 20 मालिकेत विजय मिळवला. राहुल द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाची बेंच स्ट्रेंथ मजबूत झाली आहे. त्यामुळे राहुल द्रविड यांचं संघासोबत नसणं, हा टीमसाठी एक झटकाच आहे.
आशिया कपसाठी भारतीय टीम: रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), दीपक हुड्डा, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, युजवेंद्र चहल, रवि बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.