अहमदाबाद : भारतात क्रिकेट हा खेळ धर्मासमान आहे. एकवेळ तुम्हाला क्रिकेट खेळता आलं नाही, तरी चालेल पण क्रिकेटबद्दल भरभरुन बोलता आलं पाहिजे. ब्राझीलमध्ये जसा फुटबॉल, भारतात ते क्रिकेटच स्थान आहे. भारतीय क्रिकेट टीमचा कुठलाही पराभव पचवणं, चाहत्यांसाठी खूप अवघड असतं. त्यात सामना पाकिस्तान विरुद्ध असेल, तर हायव्होल्टेज थरार मैदानात रंगतो. भारत-पाकिस्तानमधील क्रिकेट वर्ल्ड कपचा सामना खूप महत्त्वाचा असतो. फक्त सर्वसामान्य क्रिकेट चाहतेच नव्हे, तर सेलिब्रिटी सुद्धा क्रिकेट फॉलो करतात. भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल त्यांना सुद्धा प्रचंड कुतूहल असतं. भारत-पाकिस्तान वर्ल्ड कप सामन्याच्यावेळी हे सेलिब्रिटी तुम्हाला स्टेडियममध्ये दिसतात. आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुद्धा तुम्हाला हेच चित्र दिसणार आहे.
दुपारी 2 वाजता भारत-पाकिस्तानमधील महामुकाबल्याला सुरुवात होईल. हा सामना पाहण्यासाठी अनेक सेलिब्रिटी पोहोचले आहेत. भारतात क्रिकेट आणि बॉलिवूडच खास नात आहे. भारताच्या अनेक स्टार क्रिकेटर्सनी बॉलिवूडच्या प्रसिद्ध हिरॉइन सोबत लग्न केली आहेत. टायगर अली पतौडीपासून ही परंपरा सुरु आहे. सध्याच्या भारतीय संघातील विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. ती विराटच्या अनेक सामन्यांना स्टेडियममध्ये उपस्थित असते. आज नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुद्धा अनुष्का शर्मा दिसणार आहे. टीम इंडिया पाकिस्तान विरुद्ध आज मैदानात उतरेल. त्याआधी अनुष्का शर्मा, सचिन तेंडुलकर आणि प्रसिद्ध गायक अर्जित सिंह अहमदाबादमध्ये दाखल झाले आहेत. त्यांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेत.
‘भाभीजी किंगसाठी लक घेऊन येतील’
विराट कोहली नेहमीच पाकिस्तान विरुद्ध खेळ उंचावतो. मात्र, तरीही त्याच्या कुटुंबाला ट्रोल केलं जातं, हे खूपच निराशाजनक आहे असं एका कमेंटमध्ये म्हटलं आहे. भाभीजी किंगसाठी लक घेऊन येतील असं एका कमेंटमध्ये म्हटलं आहे. आज कोहली सेंच्युरी मारणार असं काही कमेंटमध्ये म्हटलं आहे.