लंडन : टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी कसून सराव करत आहे. अजिंक्य रहाणेचा टीम इंडियाच्या सिनियर खेळाडूंमध्ये समावेश होतो. ऑस्ट्रेलिया विरुद्ध फायनलमध्ये तो कमालीचा खेळ दाखवेल, अशी अपेक्षा आहे. अलीकडे तो बराच काळ टीमच्या बाहेर होता. जवळपास दीड वर्षानंतर त्याने टीम इंडियात पुनरागमन केलय. दरम्यान अजिंक्य रहाणेने मॅचआधी एक महत्वाच वक्तव्य केलय.
टीम इंडिया सध्या लंडनमध्ये आहे. लंडनच्या केनिंग्टन ओव्हल स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलचा सामना रंगणार आहे. दोन्ही टीम्सचे खेळाडू लंडनमध्ये दाखल झालेत. तिथे त्यांचा सराव सुरु आहे. टीम इंडियाची कमान रोहित शर्माच्या हाती आहे. ऑस्ट्रेलियाच नेतृत्व पॅट कमिन्सकडे आहे.
अजिंक्य रहाणे काय म्हणाला?
फायनलआधी अजिंक्य रहाणेने बीसीसीआय टीव्हीला इंटरव्यू दिला आहे. मी टीमच्या बाहेर असताना मित्र परिवार आणि कुटुंबाने पूर्ण साथ दिली. रहाणेने कुटुंबीय आणि मित्रांचे आभार मानले. “हा माझ्यासाठी भावनात्मक काळ होता. टीमच्या बाहेर असताना, कुटुंबाकडून सपोर्ट मिळाला, जो माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. भारताकडून खेळणं माझ्यासाठी खूप महत्वाच आहे. मी माझ्या फिटनेसवर खूप मेहनत केलीय. मी देशांतर्गत क्रिकेट खेळायला सुरुवात केली, त्यावेळी मला मी पुन्हा भारताकडून खेळीन हा विश्वास होता” असं अजिंक्य रहाणे म्हणाला.
द्रविड आणि रोहित बद्दल अजिंक्य काय म्हणाला?
अजिंक्य रहाणेने भारताकडून खेळताना 82 टेस्ट मॅचमध्ये 4931 धावा केल्या आहेत. रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने 2021 मध्ये ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली होती. अजिंक्यने कर्णधार रोहित शर्मा आणि हेड कोच राहुल द्रविड यांचं कौतुक केलं. “माझ्या मते, टीमची संस्कृती, वातावरण खूप चांगलं आहे. रोहीतने टीम खूप चांगल्या पद्धतीने संभाळली आहे. राहुल द्रविडही टीमला चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जातायत. दोघांची खूप मदत होते. टीममधील वातावरण खूप चांगलं आहे. प्रत्येक खेळाडू परस्परासोबत आनंदी आहे” असं रहाणे म्हणाला.