लंडन : मागचे दोन महिने यशस्वी जैस्वालसाठी खूपच चांगले ठरले. त्याचं क्रिकेट करीयर प्रगती पथावर आहे. IPL 2023 मुळे यशस्वी जैस्वालच टॅलेंट अधिक प्रखरपणे सर्वांसमोर आलं. त्याचं क्रिकेटींग करीयर एका नव्या उंचीवर आहे. राजस्थान रॉयल्सच्या या प्लेयरला आयपीएल 2023 मध्ये एमर्जिंग प्लेयर ऑफ द इयरचा अवॉर्ड मिळाला. त्याने 14 सामन्यात 48 च्या सरासरीने 625 धावा फटकावल्या. टॉप ऑर्डरमध्ये खेळताना त्याने या सर्व धावा केल्या. त्याने आयपीएलमध्ये 163 च्या स्ट्राइक रेटने बॅटिंग केली.
यशस्वी जैस्वालने दमदार खेळ दाखवला. पण राजस्थान रॉयल्सला प्लेऑफपर्यंत पोहोचता आलं नाही. यंदाच्या सीजनमध्ये यशस्वी जैस्वालच्या रुपाने टीम इंडियाच भविष्य किती उज्वल आहे, हे स्पष्ट झालं.
आयपीएलचा सीजन संपण्याआधी मिळाली गुड न्यूज
IPL 2023 चा सीजन संपण्याआधीच यशस्वी जैस्वालला आणखी एक आनंदाची बातमी मिळाली. टीम इंडियाची कॅप घालण्याच त्याचं स्वप्न साकार झालं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या टीममध्ये स्टँड बाय प्लेयर म्हणून त्याची निवड झाली.
ऋतुराजमुळे यशस्वीला संधी
ऋतुराज गायकवाडमुळे यशस्वी जैस्वालसाठी टीम इंडियाचे दरवाजे उघडले. 3 जूनला लग्न असल्याने आपल्याला टीमसोबत जाणं शक्य नाहीय, असं ऋतुराजने सिलेक्टर्स आणि बीसीसीआयला कळवलं. ऋतुराज राखीव खेळाडू म्हणून जाणार होता. त्यावेळी सिलेक्टर्सनी बॅकअप ओपनर म्हणून जैस्वालची निवड केली.
यशस्वीकडे यूकेचा व्हिसा सुद्धा आहे
7 जूनपासून इंग्लंडच्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलिया विरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल सुरु होणार आहे. यशस्वी जैस्वाल देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये फॉर्ममध्ये होताच, पण त्याशिवाय त्याच्याकडे यूकेचा व्हिसा सुद्धा होता, याची सुद्धा यशस्वीला मदत झाली.
टीम इंडियाच्या दोन दिग्गजांच मार्गदर्शन
बुधवारी यशस्वी जैस्वालने टीम इंडियासोबत पहिलं ट्रेनिंग सेशन केलं. आयसीसीने तो व्हिडिओ पोस्ट केलाय. यशस्वीने नेट्समध्ये भारताचे वेगवान गोलंदाज, नेट बॉलर्स, स्पिनर अक्षर पटेल आणि आर.अश्विनच्या गोलंदाजीचा सामना केला. राजस्थान रॉयल्समधील सहकारी अश्विनने यशस्वीला मार्गदर्शन केलं. त्यानंतर यशस्वीला विराट कोहलीच मार्गदर्शन मिळालं. विराट 23 वर्षाच्या यशस्वीला बॅटिंगबद्दल काही गोष्टी समजावताना दिसला.