मुंबई: सध्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून (cricket) लांब असलेल्या अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) घरी गुडन्यूज आहे. अजिंक्य रहाणे पुन्हा बाबा होणार आहे. अजिंक्य रहाणे आणि त्याची पत्नी राधिकाने (Radhika) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरुन ते आई-बाबा होणार असल्याची गोड बातमी दिली आहे. राधिकाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर फॅमिली फोटो शेयर केलाय. त्याला तिने ‘ऑक्टोबर 2022’ असं कॅप्शन दिलं आहे. 2014 मध्ये अजिंक्यने राधिका बरोबर लग्न केलं. 2019 मध्ये अजिंक्य रहाणेच्या घरी पाळणा हलला. राधिकाने एका गोंडस कन्येला जन्म दिला. अजिंक्य रहाणे सध्या क्रिकेटपासून दूरच आहे. आयपीएल अखेरच्या टप्प्यात असताना अजिंक्य रहाणेला दुखापत झाली होती. तो कोलकाता नाइट रायडर्सकडून खेळत होता. त्याला दुखापतीमधून सावरण्यासाठी दोन महिन्याचा कालावधी लागणार आहे.
अजिंक्य रहाणे मागच्यावर्षीपासून खराब फॉर्मचा सामना करतोय. मागच्यावर्षाच्या अखेरीस झालेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यात त्याला तिन्ही कसोटी सामन्यात संधी मिळाली. पण त्याला प्रभाव पाडता आला नाही. संघातील त्याच्या स्थानावर सातत्याने प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं. अखेरीस निवड समितीने श्रीलंकेविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी त्याला वगळलं. दुखापतीमुळे अजिंक्यचा इंग्लंड विरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यासाठी विचार झाला नाही. पण त्यानंतरही कसोटी संघात खेळण्याचा त्याचा मार्ग सोपा नसेल. कारण त्याच्याजागी हनुमा विहारी, श्रेयस अय्यर अशा खेळाडूंना निवड समिती संधी देतेय.
अजिंक्यला देशातंर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी करुन दाखवावी लागेल, तरच त्याचा विचार होऊ शकतो. वनडे आणि टी 20 संघासाठी त्यांचा विचार होणार नाही. कारण निवड समितीने या दोन्ही फॉर्मेटसाठी खेळाडू आधीच निश्चित केले आहेत. त्याच्या वयाचा विचार करता, कसोटी एकमेव पर्याय आहे. पण तिथे सुद्धा संधी मिळवण्यासाठी त्याला देशातंर्गत क्रिकेट मध्ये सर्वोत्तम प्रदर्शन करुन दाखवावं लागेल. अजिंक्य रहाणेने भारताचं कर्णधारपदही भुषवलं आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कसोटी मालिका विजय मिळवला होता.