मुंबई: भारतीय संघ (Team india) आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये व्यस्त आहे. सातत्याने क्रिकेट सामने सुरु आहेत. लवकरच आशिया कप 2022 (Asia cup) स्पर्धा सुरु होणार आहे. या सगळ्यामध्ये भारताचा देशांतर्गत क्रिकेट सीजनही सुरु होणार आहे. 8 सप्टेंबरपासून नवीन सीजन सुरु होणार आहे. सर्वात आधी दुलीप ट्रॉफीचे सामने होतील. टीम इंडियात पुनरागमनाच्या प्रतिक्षेत असलेल्या भारतीय खेळाडूंसाठी हा देशांतर्गत सीजन विशेष आहे. स्टार फलंदाज अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) सुद्धा पुनरागमनाच्या प्रतिक्षेत आहे. तो मुंबईच्या ट्रेनिंग कॅम्प मध्ये दाखल होणार आहे. सध्या कसोटी संघाबाहेर असलेला अजिंक्य रहाणे दुखापतीमधून सावरला आहे. मुंबई क्रिकेट टीम मधून देशांतर्गत क्रिकेट मध्ये पुनरागमन करण्याचा त्याने निर्धार केला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. नवीन सीजन सुरु होण्याआधी पुढच्या आठवड्यात वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स मध्ये मुंबई क्रिकेट संघाच्या इनडोर ट्रेनिंग कॅम्प मध्ये सहभागी होणार आहे.
अजिंक्य रहाणेला आयपीएल 2022 दरम्यान दुखापत झाली होती. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीनंतर तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत रिहॅबिलटेशन कार्यक्रमात सहभागी झाला होता. आता तो फिट झाला आहे. MCA त्याच्या अनुभवाचा लाभ उठवण्यासाठी उत्सुक्त आहे. “रहाणे NCA मधून परतला आहे. आता तो ठीक आहे. मी अलीकडेच त्याला भेटलो होतो. त्याच्यासारखा सीनियर खेळाडू कॅम्प मध्ये असल्यास युवा खेळाडूंना फायदाच होईल” असं MCA चे मुख्य सिलेक्टर सलील अंकोला यांनी म्हटलं आहे. रहाणेने संपूर्ण सीजन मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी कटिबद्धता दाखवली आहे. तो मुंबईचे नेतृत्व सुद्धा करणार आहे.
रहाणे 8 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या देशांतर्गत दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसेल. पीटीआयने हे वृत्त दिलं आहे. “राहणे मागच्या काही महिन्यांपासून क्रिकेट खेळलेला नाही. त्यामुळे निवडकर्ते थेट त्याला भारत अ संघात निवडणार नाहीत. कारण चांगली कामगिरी करणारे अन्य खेळाडूही प्रतिक्षेत आहेत. दुलीप ट्रॉफी मध्ये तो पश्चिम विभागाकडून खेळेल” बोर्डाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.