जोहान्सबर्ग: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Africa tour) पहिल्या कसोटी सामन्यात संघात स्थान मिळवणं, मुंबईकर अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) कठीण जाऊ शकतं, असं मत माजी क्रिकेटपटू आकाश चोप्राने (Akash chopra) व्यक्त केलं आहे. बॉक्सिंग डे च्या दिवशी 26 डिसेंबरला सेंच्युरियन सुपरस्पोर्ट पार्क येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका सुरु होणार आहे. बीसीसीआयने (Bcci) काल संघाच्या उपकर्णधारपदी लोकेश राहुलच्या नावाची घोषणा केली, त्यानंतर आकाश चोप्राने हे मत व्यक्त केलं आहे.
रोहित शर्मा दुखापतग्रस्त असल्याने त्याच्याजागी उपकर्णधारपदासाठी लोकेश राहुलच्या नावाची घोषणा करण्यात आली. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे रोहित शर्मा तिन्ही कसोटी सामन्यात खेळणार नाहीय. त्याच्याजागी इंडिया ए चा कॅप्टन प्रियांक पांचाळची संघात निवड करण्यात आली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला रहाणेच्या जागी उपकर्णधार म्हणून रोहित शर्माची नियुक्ती करण्यात आली. रोहित शर्मा आता भारताच्या टी-20 आणि वनडे संघाचा कॅप्टन आहे.
काही आठवड्यांपूर्वी नियमित कर्णधार विराट कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणेने न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व केले. पण आता त्याचा उपकर्णधारपदासाठीही विचार करण्यात आलेला नाही. ‘भारतीय क्रिकेटमध्ये गोष्टी बदलतायत’ असे आकाश चोप्राने म्हटले आहे.
“रोहित शर्मा आता वनडे आणि टी-20 चा कॅप्टन आहे. वनडेच्या उपकर्णधारपदी सुद्धा लोकेश राहुलची निवड होऊ शकते. अजिंक्य रहाणेला संघात स्थान मिळवणं कठिण जाईल. काही दिवसांपूर्वी तो कसोटी संघाचा कर्णधार होता. पण आता तो उपकर्णधारही नाहीय. भारतीय क्रिकेटमध्ये गोष्टी बदलतायत” असे कु वर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये आकाश चोप्रा म्हणाले.
न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीत अजिंक्य रहाणेने नेतृत्व केले. दुखापतीमुळे तो दुसऱ्या कसोटीत खेळू शकला नाही. अजिंक्य रहाणे सध्या करीअरच्या खराब फेजमध्ये आहे. मागच्या दोनवर्षात 16 कसोटी सामन्यात रहाणेची सरासरी अवघी 24.39 आहे. यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध मेलबर्नवर झळकवलेलं एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत अजिंक्य रहाणेच्या संघातील निवडीबद्दलही शंका उपस्थित केली जात होती. पण परदेशातील खेळपट्ट्यांवरील रहाणेची कामगिरी आणि अनुभव याचा विचार करुन, त्याची संघात निवड करण्यात आली आहे.
संबंधित बातम्या:
स्टीव्ह स्मिथचे बेडरुममधील चाळे पत्नीने केले उघड, मध्यरात्री एकच्या सुमारास….
ना ‘नो बॉल’, ना ‘डेड बॉल’, फलंदाज क्लीन बोल्ड होऊनही Not out, कसं काय? पाहा VIDEO
AUS vs ENG: अखेर अॅशेस सीरीजमध्ये कोरोनाची एंट्री, कसोटी मालिका धोक्यात?