अहमदाबाद : वर्ल्ड कप 2023 च्या फायनलमध्ये कुठल्या दोन टीम खेळणार? ते निश्चित झालय. 19 नोव्हेंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत-ऑस्ट्रेलिया आमने-सामने असतील. टीम इंडियाने सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडला हरवून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सेमीफायनल मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेला पराभवाच पाणी पाजलं. टीम इंडिया चौथ्यांदा वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. तेच ऑस्ट्रेलियन टीमची वर्ल्ड कप फायनलमध्ये पोहोचण्याची ही आठवी वेळ आहे. त्यांनी 5 वेळा वर्ल्ड कप जिंकलाय. टीम इंडियाने दोनदा विश्वचषक उंचावलाय. टीम इंडिया वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये अजेय आहे. सलग 10 सामने जिंकलेत. टीम इंडियाच्या या प्रवासात फलंदाजांपासून गोलंदाजांनी आपलं योगदान दिलय. टीम इंडियाने या टुर्नामेंटमध्ये कमालाची गोलंदाजी केलीय. टीमच्या सर्व 5 गोलंदाजांनी शानदार प्रदर्शन केलय. मोहम्मद शमी जबरदस्त हिट ठरलाय. तो या वर्ल्ड कपमधला सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याच्या नावावर 23 विकेट आहेत. फक्त 6 सामन्यात त्याने इतक्या विकेट घेतल्या आहेत. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये मोहम्मद शमी टीम इंडियाचा भाग नव्हता.
शमीशिवाय जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जाडेजा आणि कुलदीप यादवने प्रतिस्पर्धी टीमच्या फलंदाजांना अडचणीत आणलं. वर्ल्ड कपमध्ये असेही काही प्रसंग आले, जेव्हा बुमराह आणि सिराज चालले नाहीत. पण कुलदीप यादवने विरोधी टीमला आपल्या फिरकीच्या तालावर नाचवलं. कुलदीपने 10 सामन्यात 15 विकेट घेतल्या आहेत. दोन मेडन ओव्हर त्याने टाकल्या आहेत. न्यूझीलंड विरुद्ध सेमीफायनल मॅचमध्ये जी गोलंदाजी कुलदीपने केली, ती दीर्घकाळ लक्षात राहील. ज्या पीचवर गोलंदाज धावा देत होते, तिथे कुलदीपने 10 ओव्हरमध्ये 56 रन्स देऊन 1 विकेट काढला. कुलदीपने सामन्यात महत्त्वाच्या क्षणी धावा रोखल्या. कुलदीपचा टर्न फलंदाजांना त्रासदायक ठरतोच पण त्याने स्पीड सुद्धा वाढवलाय. त्यामुळे तो अजून घातक बनलाय. फलंदाजांना त्याची गोलंदाजी लक्षात येत नाहीय.
त्यावरुन त्याचं टीममधील महत्त्व लक्षात येतं
कुलदीप यादव विकेटटेकिंग गोलंदाज आहे. त्याने धावा जास्त दिल्या तरी, रोहितला टेन्शन नसतं. कारण त्याला माहित असतं, जेव्हा बॅट्समन धावांच्या मागे पळणार तेव्हा विकेट देणार. अश्विन सारखा अनुभवी गोलंदाज टीममध्ये आहे. पण त्याजागी कुलदीपला संधी दिली जातेय, यावरुन त्याच टीममधील महत्त्व तुमच्या लक्षात येईल. कुलदीपचा हा फॉर्म फायनलमध्येही कायम राहिल अशी टीम इंडियाला अपेक्षा असेल. फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामना आहे. लीग स्टेजमध्ये मॅच झाली. त्यावेळी कुलदीपने ऑस्ट्रेलियाचे दोन विकेट काढले होते.