न्यू यॉर्क : अमेरिकेत सध्या मेजर लीग क्रिकेटचे सामने सुरु आहेत. या T20 लीगमध्ये IPL मधील अनेक खेळाडू आपलं कौशल्य दाखवत आहेत. अमेरिकेतील या T20 लीगमध्ये हेनरिक क्लासेनने इतिहास रचला आहे. मेजर क्रिकेट लीगच्या इतिहासातील शतक ठोकणारा तो पहिला खेळाडू बनला आहे. ओरकासकडून खेळताना हेनरिक क्लासेनने MI न्यू यॉर्क विरोधात आक्रमक फटकेबाजी केली. MI न्यूयॉर्कने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 8 विकेट गमावून 194 धावा केल्या.
195 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या ओरकास टीमंने 19.2 ओव्हर्समध्येच विजयी लक्ष्य गाठलं. क्लासेनने 44 चेंडूत नॉटआऊट 110 धावा ठोकल्या. त्याने आपल्या तुफानी इनिंगमध्ये 9 फोर आणि 7 सिक्स मारले. त्याने राशिद खानलाही सोडलं नाही.
राशिद खानच्या ओव्हरमध्ये ठोकल्या 26 धावा
क्लासेनने न्यूयॉर्कच्या प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला. राशिद खानच्या एका ओव्हरमध्ये 26 धावा ठोकल्या. क्लासेनच्या तुफानी बॅटिंगमुळे ओरकासने 4 चेंडू आणि 2 विकेट राखून विजय मिळवला. क्लासेनने 41 चेंडूत शतक पूर्ण केलं. राशिद खानच्या 16 व्या ओव्हरमध्ये 3 सिक्स आणि एक फोर मारला. राशिद खानच्या ओव्हरमध्ये क्लासेन 64 वरुन थेट 90 धावांवर पोहोचला. तो आपल्या शतकाच्या जवळ पोहोचला होता. त्यावेळी विस आणि ट्रेंट बोल्टच्या ओव्हरने थोडं टेन्शन वाढवलं होतं.
बोल्टने टेन्शन दिलं
विसेच्या ओव्हरमध्ये ओरकासचा विकेट पडला. 18 व्या ओव्हरमध्ये बोल्ट गोलंदाजीला येताच त्याने वाट लावली. पहिल्या 2 चेंडूंवर त्याने 2 विकेट घेतले. यानंतर एक वाइड चेंडू टाकला. चौथ्या चेंडूवर पुन्हा एकदा विकेट घेतला. त्यावेळी क्लासेन 95 रन्सवर खेळत होता.
The ? moment when Heinrich Klaasen scored the first ever century in #MajorLeagueCricket history ???pic.twitter.com/CozCEVdQhX
— 12th Khiladi (@12th_khiladi) July 26, 2023
सिक्स मारुन विजय
एहसान आदिलने 19 वी ओव्हर टाकली. या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर क्लासेन थोडक्यात वाचला. पुढच्याच चेंडूवर चौकार मारुन त्याने शतक पूर्ण केलं. ओरकासने क्वालिफायर 1 मध्ये सुद्धा आपलं स्थान निश्चित केलं आहे. क्लासेनने सिक्स मारुन आपल्या टीमला विजय सुनिश्चित केला. 20 व्या ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर लॉन्ग ऑनवरुन सिक्स मारुन त्याने टीमला विजय मिळवून दिला.