मुंबई: टॅलेंट बरोबर नम्रता, समजूतदारपणा आवश्यक असतो. कारण या दोन गोष्टी तुमच्याकडे असतील, तर तुम्ही व्यक्ती म्हणून मोठे होता. क्रीडा क्षेत्रात अनेक खेळाडू गुणवान असतात. पण नम्रतेचा भाव फार कमी जणांकडे असतो. ब्रेट ली (Bret lee) आणि अँड्र्यू सायमन्ड्स (Andrew Symonds) या दोन नावांमधून फरक तुमच्या लगेच लक्षात येईल. अँड्र्यू सायमन्ड्स ब्रेट ली इतकाच प्रतिभावान क्रिकेटपटू. पण तो नेहमीच वेगवेगळ्या विधानांमुळे चर्चेत राहिला. कुठल्याही क्षेत्रात काम करताना, अॅटिट्यूड खूप महत्त्वाचा असतो. फक्त तो अॅटिट्यूड अहंकार, हट्टीपणाकडे झुकणारा नसावा. सायमन्ड्सच्या बाबतीत नेमकं हेच झालं. फक्त एक उत्तम क्रिकेटपटू (Cricketer) म्हणून तो लक्षात रहायला पाहिजे होता. पण तो क्रिकेटच्या बरोबरीने त्याने केलेल्या विधानांसाठी लक्षात राहतो. मागच्या शनिवारीच अँड्र्यू सायमन्ड्सचं कार अपघातात निधन झालं. वयाच्या अवघ्या 46 व्या वर्षी सायमन्ड्सने जगाचा निरोप घेतला. त्याच्या निधनाची बातमी अनेकांना चटका लावून गेली. सायमन्डसची धिप्पाड शरीर यष्टी, ओठांवरच क्रीम, त्याचे केस सगळचं डोळ्यासमोर आलं. सायमन्डस तीन वादांसाठी कायम लक्षात राहिलं.
2007-08 साली भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला होता. सिडनीत सीरीजमधील दुसरा कसोटी सामना सुरु होता. यजमान संघाने म्हणजे ऑस्ट्रेलियाने हा सामना जिंकला होता. सामन्यादरम्यान हरभजन आणि सायमंड्स मध्ये वादावादी झाली होती. सामन्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार रिकी पॉन्टिंगने सामनाधिकाऱ्यांकडे हरभजन विरोधात तक्रार केली होती. हरभजनने वर्णद्वेशी टिप्पणी केल्याचा आरोप केला होता. हरभजनने सायमंड्सला माकड म्हटल्याचं पॉन्टिंगने आरोप केला होता.
मॅथ्यू हेडन आणि अँड्र्यू सायमन्ड्स दोघे परस्परांचे चांगले मित्र. ऑस्ट्रेलियन संघातून एकत्र खेळताना त्यांच्यात चांगली गट्टी जमली. सायमन्ड्स आणि हेडन दोघांना मासेमारीची आवड होती. अनेकदा दोघे एकत्र समुद्रात मासेमारीसाठी जायचे. सायमन्ड्सच हेडनच्या घरी सुद्धा येण-जाणं असायचं. एकदा एका मुलाखतीत सायमन्ड्सला या बद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्याने दिलेलं उत्तर आजही लक्षात आहे. मी हेडनकडे जेवायला जातो. कारण त्या निमित्ताने मला त्याच्या पत्नीला केलीला पाहता येतं, असं विधान सायमन्ड्सने केलं होतं. सायमन्ड्सच्या त्या विधानावरुन काही जणांनी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण हेडन आणि सायमन्ड्सची मैत्रीच तशी होती. त्यांच्या नात्यात परस्पराबद्दल आदर, विश्वासाची भावना होती. त्यामुळे सायमन्ड्स इतक्या मोकळेपणाने ते विधान करु शकला.
सायमन्ड्सने मुलाखतीत मॅथ्यू हेडनची पत्नी केलीचा उल्लेख केला होता. हेडनच्या घरी गेल्यावर जेवणाच्या निमित्ताने तिला पाहता येत असं सायमन्ड्सने म्हटलं होतं. ही केली हेडन एक गृहिणी आहे. हेडनचा केली बरोबर सुखाने संसार सुरु आहे. या जोडप्याला तीन मुलं आहेत. जोशुआ आणि थॉमस अशी हेडनच्या दोन मुलांची नाव आहेत. त्यांना मुलगी असून तिचं नाव ग्रेस आहे. मॅथ्यू हेडनचे अँड्रयू सायमन्डस बरोबर कौटुंबिक संबंध होते.
सायमन्ड्स मैदानावर जितका आक्रमक असायचा. मैदानाबाहेरही तो तसाच होता. क्रिकेट चाहत्यांना अनेकदा आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंना भेटण्याची इच्छा असते. 2008 मध्ये एका चाहत्याला सायमन्ड्सची गळाभेट घ्यायची होती. पण सायमन्ड्सने त्याला मारहाण केली. याचे पुरावे मिळाले नाही. त्यामुळे सायमन्ड्स वाचला.