नवी दिल्ली: ICC अंडर 19 महिला वर्ल्ड कपच पहिल्यांदा आयोजन होणार आहे. बीसीसीआयने या टुर्नामेंटसाठी भारतीय टीमची घोषणा केली आहे. ज्या खेळाडूंना टीममध्ये संधी दिलीय, त्यात उन्नावची अर्चना देवी सुद्धा आहे. अर्चनासाठी वर्ल्ड कप आयुष्य बदलून टाकणारी टुर्नामेंट असणार आहे. अर्चनाच बालपण गरीबीत गेलं. तिने संघर्ष केलाय. अर्चनासाठी क्रिकेटच जीवन आहे. आता तिच्याकडे भारताच प्रतिनिधीत्व करण्याची संधी आहे.
छोट्या भावाचा सर्पदंशामध्ये मृत्यू
अर्चना उन्नावमधील छोटसं गाव पुरवाची निवासी आहे. लहानपणीच तिचे वडिल वारले. त्यानंतर 2017 साली छोट्या भावाचा सर्पदंशामध्ये मृत्यू झाला. महिन्याचा खर्च भागवण्यासाठी शेती करावी लागली. दोनवेळच्या जेवणाची व्यवस्था करण्यासाठी बरेच कष्ट करावे लागले.
…आणि अर्चनाच नशीब बदलल
अर्चनाच्या घरची परिस्थिती इतकी वाईट होती की, क्रिकेट अकादमी सोडा, ते तिला शाळेतही पाठवू शकत नव्हते. कसंबस तिने कस्तुरबा गांधी शाळेत शिक्षण पूर्ण केलं. अर्चनाची खेळातील आवड पाहून शाळेचे शिक्षक तिला कानपूरला घेऊन गेले. अर्चनाची टीचर पूनम गुप्ताने तिला क्रिकेट किट दिलं. अकादमीत प्रवेश मिळवून दिला. क्रिकेट अकादमीन सुद्धा अर्चनाकडून कुठलीही फी घेतली नाही. या अकादमीत तिची ओळख कुलदीप यादवचे कोच कपिल यांच्याशी झाली. त्यांनी अर्चनामधील प्रतिभा हेरली.
कुलदीपने ट्रेनिंग करताना काय दिला सल्ला?
कपिल यांच्या अकादमीत ट्रेनिंग करताना अनेकदा कुलदीप यादव बरोबर भेट झाली. दैनिक जागरणला दिलेल्या मुलाखतीत अर्चनानने ही माहिती दिली. कुलदीपकडून बरच काही शिकायला मिळाल्याच, अर्चनाने सांगितलं. कुलदीपने अर्चनाला खेळावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला. बॅट्समन आक्रमक होऊन बॅटिंग करेल, तेव्हा बॉलिंगमध्ये वैविध्य आणण्याचा सल्ला दिला. अंडर 19 महिला वर्ल्ड कप टुर्नामेंट दक्षिण आफ्रिकेत होणार आहे. 14 ते 29 जानेवारी 2023 दरम्यान ही टुर्नामेंट होईल. एकूण 16 टीम या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. भारत ग्रुप डी मध्ये आहे. दक्षिण आफ्रिका, यूएई आणि स्कॉटलंडची टीम या ग्रुपमध्ये आहे.
अंडर-19 महिला वर्ल्ड कप 2023 साठी भारतीय स्क्वॉडः शेफाली वर्मा (कॅप्टन), श्वेता शहरावत (उपकर्णधार), ऋचा घोष (विकेटकीपर), जी त्रिशा, सौम्या तिवारी, सोनिया मेहदिया, हर्ले गाला, ऋषिता बासु (विकेटकीपर), सोनम यादव, मन्नत कश्यप, अर्चना देवी, पार्शवी चोपड़ा, तितस साधु, फलक नाज, शबनम मोहम्मद