मुंबई: अर्जुन तेंडुलकरने बुधवारी गोव्याच्या टीमकडून रणजी डेब्यु करताना शानदार शतक झळकावलं. त्यामुळे या शतकाची चर्चा होणं स्वाभाविक आहे. अर्जुनने हे शतक झळकावतानाच आपल्याच वडिलांचा 34 वर्षापूर्वीचा कित्ता गिरवला. अर्जुनचे वडिल सचिन तेंडुलकर यांनी 1988 साली रणजी डेब्युमध्ये शतक झळकावलं होतं. अर्जुनच्या या शानदार शतकानंतर एक स्टोरी समोर आलीय. अर्जुनच्या या यशामध्ये युवराज सिंगचे वडिल योगराज सिंग यांचं योगदान आहे.
सचिनची विनंती लगेच मान्य केली
युवराज सिंगने काही महिन्यापूर्वी वडिल योगराज सिंग यांना फोन केला. त्यावेळी त्याने अर्जुनने तुमच्या अंडर ट्रेनिंग करावी, अशी सचिनची इच्छा असल्याचं सांगितलं. योगराज सिंग यांनी नकार दिला नाही. त्यांनी सचिनची विनंती मान्य केली. इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त दिलय. अर्जुनला ट्रेनिंग देण्यासाठी ते तयार झाले. अर्जुनच्या टीमने मुंबईची टीम सोडून गोव्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला. मुंबईच्या टीममधून संधी मिळण्याची शक्यता कमी होती. त्यामुळे अर्जुनने गोव्याचा रस्ता धरला.
योगराज यांनी अर्जुनला दिला गुरुमंत्र
योगराज सिंग यांच्याकडून ट्रेनिंग घेण्यासाठी अर्जुन चंदीगडमध्ये दाखल झाला. अर्जुन दोन आठवडे योगराज सिंग यांच्याकडे होता. योगराज यांनी अर्जुनला पहिली एकच गोष्टी सांगितली. पुढच्या 15 दिवसांसाठी विसरुन जा, की तू सचिन तेंडुलकरचा मुलगा आहेस. योगराज सिंग यांचा हा मंत्र चांगलचा फळला. योगराज यांनी आपल्या स्टाइलमध्ये अर्जुनला ट्रेनिंग दिली. त्याच्या मानसिकतेवर काम केलं. आज रिजल्ट आपल्या सगळ्यांसमोर आहे.
फक्त 15 दिवस घेतली मेहनत
योगराज सिंग यांना कठोर कोच मानलं जातं. युवराज सिंगला सुरुवातीच्या दिवसांमध्ये योगराज यांनी ट्रेनिंग दिली होती. वडिलांच्या कठोर शिस्तीमुळेच मी एक चांगला क्रिकेटर बनू शकलो, असं युवराजने एका मुलाखतीत सांगितलं. योगराजन यांनी अर्जुनवर फक्त 15 दिवस मेहनत घेतली. आज निकाल सर्वांसमोर आहे.
योगराज यांची अर्जुनबद्दल भविष्यवाणी
अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीमध्ये शतक झळकवताच योगराज सिंग यांनी भविष्यवाणी केली. योगराज अर्जुनला म्हणाले की, बेटा खूप चांगली बॅटिंग केलीस. एकदिवस तू मोठा ऑलराऊंडर बनशील. अर्जुनने 207 चेंडूत 120 धावा केल्या. त्याने 2 षटकार आणि 16 चौकार लगावले. अर्जुनने सुयश प्रभुदेसाई सोबत मिळून 221 धावांची भागीदारी केली. सुयश प्रभुदेसाईने द्विशतक झळकावलं. त्याने 212 धावा केल्या.