मुंबई: आशिया कप (Asia cup) स्पर्धेत सर्वांना उत्सुक्ता आहे, ती महामुकाबल्याची. हा महामुकाबला 28 ऑगस्टला भारत-पाकिस्तान मध्ये रंगणार आहे. या सामन्याआधी क्रिकेट वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा आधीपासूनच सुरु आहेत. दोन्ही बाजूचे माजी क्रिकेटपटू वेगवेगळे अंदाज वर्तवतायत. कोणाचं बलाबल कसं आहे, त्यावरुन विजयाचे दावे-प्रतिदावे सुरु आहेत. भारत-पाकिस्तान (IND vs PAK) सामन्याच्यावेळी पराभव कोणालाच मान्य नसतो. त्यामुळे या हाय प्रेशर गेम मध्ये संघ निवड महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या लढतीआधी रोहित शर्माला (Rohit Sharma) बराच विचार करावा लागेल. जसप्रीत बुमराह, हर्षल पटेल दुखापतीमुळे आशिया कप मध्ये नाहीयत. रोहितला युवा वेगवान गोलंदाजांवर अवलंबून रहावं लागणार आहे. त्याशिवाय दिनेश कार्तिकला संघात कसं बसवायचं? हा सुद्धा रोहित समोर प्रश्न आहे.
पहिले पाच फलंदाज कोण असतील? ते जवळपास निश्चित आहे. स्वत: रोहित शर्मा केएल राहुल सोबत सलामीला येईल. विराट कोहली नंबर 3 वर, सूर्यकुमार यादव चौथ्या आणि ऋषभ पंत पाचव्या स्थानावर येईल.
दीपक हुड्डा आणि दिनेश कार्तिक या दोघांपैकी कोणाला निवडायचं? हा रोहित समोर मुख्य प्रश्न आहे. एक फिनिशर आहे, तर दुसरा ऑलराऊंडर. हुड्डाच्या समावेशाने सहाव्या गोलंदाजाचा पर्याय मिळतो. पण तो संघात नसेल, तर पाच गोलंदाजांना आपल्या कोट्याची षटक पूर्ण करावीच लागतील. यात रवींद्र जाडेजा आणि हार्दिक पंड्या आहे.
दीपक हुड्डाने टॉप ऑर्डर मध्ये खेळताना अलीकडे चमकदार कामगिरी केलीय. दिनेश कार्तिक देखील फिनिशरच्या रोल मध्ये 7 व्या क्रमांकावर यशस्वी ठरलाय. हुड्डा संधी दिली तर कार्तिकला वगळावं लागेल. मग अशा स्थितीत दिनेश कार्तिकला आशिया कपच्या संघात निवडण्याचा फायदा होणार नाही.
इंग्लंड आणि वेस्ट इंडिज दौऱ्यानंतर आवेश खानच्या आधी अर्शदीप सिंहला प्राधान्य मिळेल, हे स्पष्ट आहे. जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल या मालिकेत खेळत नाहीयत. अशावेळी अर्शदीप भुवनेश्वर कुमार सोबत गोलंदाजीचा भार संभाळू शकतो.
टी 20 च्या छोट्याशा करीयर मध्ये अर्शदीप सिंहने सिलेक्टर्सना प्रभावित केलय. 6 सामन्यात त्याने 6.33 च्या सरासरीने 9 विकेट घेतल्यात. डेथ ओव्हर्स म्हणजे अखेरच्या षटकांमध्ये अर्शदीपचे यॉर्कर आणि गोलंदाजीतील वैविध्य प्रभावी ठरते.