मुंबई: पाकिस्तानची टीम आशिया कप जिंकण्याच स्वप्न पाहत आहे. 11 सप्टेंबरला म्हणजे आज ते श्रीलंकेविरुद्ध फायनल खेळण्यासाठी मैदानात उतरतील. याआधी दोन्ही टीम्स सुपर 4 मध्ये आमने-सामने आल्या होत्या. पाकिस्तानचा या मॅचमध्ये लज्जास्पद पराभव झाला होता. आज पाकिस्तानची टीम या पराभवाचा हिशोब चुकता करण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल. पण किताब जिंकण पाकिस्तानसाठी सोपं नसेल.
फायनल आधी पाकिस्तानला आपल्याच खेळाडूंनी दगा दिला आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सलमान बटने फायनलाधी पोल-खोल केली आहे. “पाकिस्तानी टीमची हालत खूप खराब आहे. पाकिस्तानी फलंदाज गुगली खेळू शकत नाहीत. गुगली खेळताना चेंडू हवेत मारुन संपूर्ण टीम ऑलआऊट होते” असं बट एका मुलाखतीत म्हणाला. पाकिस्तानी फलंदाजांना वानिंदु हसरंगाची गोलंदाजी खेळणं झेपत नाहीय, असं बटने सांगितलं. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात नसीम शाह आणि शादाब खेळले नव्हते.
“या स्पर्धेत आमची मधली फळी प्रभावी कामगिरी करु शकलेली नाही. त्यांनी स्वत:ला प्रश्न विचारला पाहिजे. आम्ही फलंदाज, पावर हिटर म्हणून टीममध्ये आहोत. मात्र तरीही नवाज आणि शादाबला फलंदाजीसाठी वरती पाठवलं जातं. याचा अर्थ ते जास्त चांगली फलंदाजी करतात. पाकिस्तानी टीमला चौथ्या क्रमांकावर एका चांगल्या फलंदाजाची आवश्यकता आहे” असं सलमान बट म्हणाला.
“तुम्ही मोहम्मद रिजवान, विराट कोहलीकडे पहा, त्यांनी पळून धावा केल्या आहेत. टॉप प्लेयर्सनी गॅपचा पुरेपूर फायदा उचलला आहे. त्यांचा स्ट्राइक रेट 140 पेक्षा जास्त आहे. फक्त मोठ्या फटक्यांनी स्ट्राइक रेट वाढतो, असा विचार असेल, तर चांगले गोलंदाज सतत मार खाणार नाहीत” असं सलमान बट म्हणाला. “तुम्हाला योग्य बॅटिंगसह धावा बनवता आल्या पाहिजेत. मिडल ऑर्डरमध्ये फलंदाजाची कमतरता जाणवत आहे. आमच्या पावर हिटर्सनी थोडा फलंदाजांसारखा विचार केला पाहिजे” असं सलमान बटने म्हटलं.