मुंबई: भारताने आशिया कप (Asia cup) स्पर्धेची दमदार सुरुवात केली आहे. परंपरागत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर (IND vs PAK) पाच विकेट राखून विजय मिळवला. हार्दिक पंड्या, (Hardik Pandya) रवींद्र जाडेजा आणि भुवनेश्वर कुमार भारताच्या विजयाचा हिरो ठरले. या तिघांच्या कामगिरीच्या बळावर भारताने पाकिस्तानला धूळ चारली व मागच्यावर्षीच्या पराभवाची सव्याज परतफेड केली. दुबईच्या याच मैदानात मागच्यावर्षी टी 20 वर्ल्ड कपच्या साखळी फेरीत पाकिस्तानने भारतावर 10 गडी राखून एकतर्फी विजय मिळवला होता. काल टीम इंडियाने मोक्याच्याक्षणी कामगिरी उंचावून तमाम देशवासियांनी जल्लोष करण्याची संधी दिली. भारताचा कॅप्टन रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी त्याचा निर्णय योग्य ठरवला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्तानी संघाला भारतीय गोलंदाजांनी 147 धावांवर रोखलं.
त्यानंतर भारताने 19.4 षटकात हे आव्हान पार केलं. रवींद्र जाडेजाच्या 29 चेंडूत 35 धावा आणि हार्दिक पंड्याच्या 17 चेंडूत नाबाद 33 धावा भारताच्या विजयात महत्त्वपूर्ण ठरल्या. जाडेजाने दोन चौकार आणि दोन षटकार लगावले, तर हार्दिकने चार चौकार आणि एक षटकार मारला. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 50 पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली. मूळात कमी चेंडूत जास्त धावांची आवश्यकता असताना, दोघांनी दमदार फलंदाजी केली.
His confidence when he had a dot ball and the next ball goes for a six. @hardikpandya7 ?????? pic.twitter.com/vivkPmfUTu
— Jim Halpert (@jiimhalpert) August 28, 2022
शेवटच्या षटकात भारताला विजयासाठी 6 चेंडूत 7 धावांची आवश्यकता होती. डावखुरा फिरकी गोलंदाज मोहम्मद नवाजच्या हाती चेंडू होता. पहिल्या चेंडूवर रवींद्र जाडेजा मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बोल्ड झाला. त्यानंतर स्ट्राइकवर आलेल्या दिनेश कार्तिकने चेंडूवर एक धाव निघाली. चार चेंडूत विजयासाठी 6 धावांची आवश्यकता होती. हार्दिकने पुढचा चेंडू निर्धाव खेळून काढला. 3 चेंडूत विजयासाठी 6 धावा हव्या होत्या. थोडी टेन्शनची स्थिती होती. दिनेश कार्तिकने हार्दिककडे बघितलं, त्यावेळी हार्दिकने नजरेनेच त्याला निर्धास्त रहाण्याचा इशारा केला. हार्दिकचा त्या कॉन्फिडन्स मधूनच सर्व काही समजून गेलं. त्यानंतर मोहम्मद नवाजच्या पुढच्याच चेंडूवर हार्दिकने थेट षटकार ठोकून विजयावर शिक्कामोर्तब केलं. मॅच दरम्यान नजरेतूनच हार्दिकने जो आत्मविश्वास दाखवला, त्याच सर्वत्र कौतुक होतय. सोशल मीडियावर हार्दिकच्या त्या Reaction चा व्हिडिओ व्हायरल झालाय.