मुंबई: आशिया कप (Asia Cup) स्पर्धा 27 ऑगस्टपासून UAE मध्ये सुरु होत आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाची निवड झाली आहे. 15 सदस्यीय भारतीय संघात केएल राहुलचं (KL Rahul) नाव आहे. स्पर्धा खेळण्यासाठी तो यूएईला जाणार की, नाही, याचा निर्णय पुढच्या आठवड्यात होईल. तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल, आता काय झालं?. यामागे कारण आहे, केएल राहुलचा फिटनेस. त्याच्या फिटनेस बद्दल अजूनही साशंकता कायम आहे. संघासोबत यूएईला जाण्याआधी केएल राहुलला फिटनेस टेस्ट मध्ये पास व्हाव लागेल, असं वृत्त आहे. बीसीसीआयची टीम NCA मध्ये केएल राहुलची फिटनेस टेस्ट घेईल.
केएल राहुल आयपीएल 2022 नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. त्याला आधी ग्रोइनची दुखापत झाली होती. त्यानंतर कोरोनाची लागण झाली. राहुल आता यातून रिकव्हर झाला आहे, असं एनसीए मधील सूत्रांच्या हवाल्याने insidesport.in ने वृत्त दिलं आहे. पण त्याची अधिकृत फिटनेस टेस्ट अजून बाकी आहे. BCCI चे फीजियो शक्यतो, पुढच्या आठवड्यात राहुलची फिटनेस टेस्ट घेतील.
BCCI च्या सुत्रांनी insidesport ला सांगितलं की, “केएल राहुल दुखापतीमधून पूर्णपणे सावरला आहे. त्यामुळेच त्याची संघात निवड करण्यात आली. पण प्रोटोकॉलनुसार, त्याची फिटनेस टेस्ट घ्यावी लागेल. तो बंगळुरुत फिटनेस टेस्ट देईल”
केएल राहुल फिटनेस टेस्ट मध्ये फेल झाला, तो 100 टक्के फिट नसेल, तर मग पुढे काय? अशा परिस्थितीत राहुलच्या जागी श्रेयस अय्यरला UAE ला पाठवण्यात येईल. श्रेयस अय्यरला स्टँडबायवर ठेवण्यात आलं आहे.