मुंबई: टी 20 वर्ल्ड कपच्या (T 20 World cup) दोन महिने आधी बीसीसीआयने (Bcci) पुन्हा पॅडी अप्टन यांची नियुक्ती केली आहे. या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पॅडी अप्टन (Paddy Upton) हे ‘मेंटल कंडिशनिंग’ कोच आहेत. खेळाडूंना मानसिक दृष्टया कणखर बनवण्यासाठी पॅडी अप्टन काम करतात. टीम इंडियाच मानसिक आरोग्य लक्षात घेऊन कॅप्टन रोहित शर्मा पॅडी अप्टन यांच्या नियुक्तीसाठी आग्रही होता. सध्या टीम इंडियाचा सुपरस्टार विराट कोहली खराब फॉर्मचा सामना करतोय. अशावेळी मानसिक आरोग्य सुद्धा महत्त्वाचं असतं. या परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी मनाची सक्षमता, कणखरता देखील तितकीच महत्त्वाची असते. विराट कोहली मागच्या तीन वर्षात शतक झळकवू शकलेला नाही. त्याच्या बॅट मधून धाव होत नाहीयत. त्यामुळे सातत्याने त्याच्यावर चहूबाजूंनी टीका सुरु आहे. संघातून त्याला बाहेर करण्याची सुद्धा चर्चा सुरु आहे.
या सगळ्या परिस्थितीतून विराटला बाहेर काढण्यासाठी पॅडी अप्टन त्याच्यावर मेहनत घेत आहेत. अप्टन यांच्या उपस्थितीत गोष्टी हळूहळू बदलतायत. पॅडी अप्टन विराट कोहलीसोबत वेळ घालवतायत. त्याच्याशी चर्चा करत आहेत, त्याचा रिझल्ट हळूहळू दिसायला लागलाय.
विराटला मानसिक दृष्ट्या कणखर बनवून त्याला त्याच्या बेस्ट फॉर्म मध्ये आणणं, हे सध्या अप्टन यांच्यासमोर चॅलेंज आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पॅडी अप्टन यांनी विराट कोहलीसोबत 4 सेशन्सच प्लानिंग केलं आहे. प्रत्येक सेशन हे 45 मिनिटांच असेल. इनसाइड स्पोर्ट्ने हे वृत्त दिलय.
या 45 मिनिटांच्या सेशन्स मध्ये पॅडी अप्टन हे विराट कोहलीला बॅटिंग कशी करायची ते सांगणार नाहीत. त्यांचा भर विराटला मानसिक दृष्ट्या कणखर बनवण्यावर असेल. टीम इंडियाच्या व्हिडिओ विश्लेषकाने विराट कोहलीच्या सर्वोत्तम खेळींचे व्हिडिओ बनवलेत. विराट कोहलीच्या मनातील नकारात्मक भावना दूर करुन सर्वोत्तम फलंदाजीसाठी प्रेरित करण्याचं काम अप्टन करणार आहेत.