मुंबई: आशिया कप स्पर्धेत काल दुसऱ्यांदा भारत-पाकिस्तानचे संघ आमने-सामने आले. आता सुपर 4 राऊंड सुरु झालाय. पाकिस्तानने काल टीम इंडियाचा पाच विकेटने पराभव केला. दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम मध्ये हा सामना झाला. पाकिस्तानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारताने 7 विकेट गमावून 181 धावा केल्या. पाकिस्तानने शेवटच्या षटकात विजयी लक्ष्य पार केलं.
पाकिस्तान विरुद्ध टीम इंडियाचा पराभव झाला. पण काल विराट कोहलीची बॅट तळपली. त्याने 44 चेंडूत 60 धावांची दमदार खेळी केली. यात चार चौकार आणि एक षटकार होता. विराट कोहलीची बॅटिंग पाहून तो फॉर्म मध्ये परतल्याचे संकेत मिळत आहेत. विराटने आशिया कपच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध 35 धावा केल्या. हाँगकाँग विरुद्ध दुसऱ्या मॅच मध्ये नाबाद 59 धावांची खेळी केली होती. विराटच हे सलग दुसरं अर्धशतक आहे.
विराट कोहलीने काल दमदार खेळ दाखवला. पण फिल्डिंगच्यावेळी तो डगआऊट एरीया मध्ये बसून होता. अनेकांना प्रश्न पडला होता की, विराट मैदानावर का नाहीय? विराट एक चांगला क्षेत्ररक्षक आहे. फिल्डिंगच्यावेळी तो डगआऊट मध्ये का बसून आहे? या प्रश्नाच उत्तर मिळालं आहे. विराटला पायाच्या स्नायूंमध्ये त्रास होत होता.
सातव्या ओव्हर मध्ये चहल गोलंदाजी करत होता. चहलच्या चेंडूवर रिजवानने लाँग ऑफ रीजनमध्ये शॉट मारला. त्यावेळी कोहलीने चौकार वाचवण्यासाठी डाइव्ह मारला. पण चेंडूने सीमारेषा पार केली. त्यावेळी कोहलीला त्रास जाणवला. त्यानंतर कोहली 3-4 ओव्हरपर्यंत मैदानात फिल्डिंग करत होता. त्याने फखर झमनची कॅचही पकडली. त्यानंतर कोहली डग आऊट मध्ये बसून होता.