लाहोर : आशिया कप स्पर्धेत सध्या सुपर-4 राऊंड सुरु आहे. काल पाकिस्तान आणि बांग्लादेशमध्ये सामना झाला. या मॅचमध्ये पाकिस्तानने बांग्लादेशवर 7 विकेटने विजय मिळवला. पाकिस्तानच्या या विजयानंतर कॅप्टन बाबर आजमने टीम इंडियाची चिंता वाढवणारं वक्तव्य केलं. भारत-पाकिस्तानमध्ये येत्या 10 सप्टेंबरला सुपर फोर राऊंडमधील सामना होणार आहे. पाकिस्तानने आपल्या पहिल्या सुपर फोर सामन्यात बांग्लादेशवर मोठा विजय मिळवला. आता त्यांचं पुढच लक्ष्य टीम इंडिया आहे. विजयानंतर कॅप्टन बाबर आजमने आपल्या वेगवान गोलंदाजांच भरभरुन कौतुक केलं. भारताविरुद्ध मोठी मॅच आहे. त्याआधी वेगवान गोलंदाजांच्या प्रदर्शनामुळे टीमचा आत्मविश्वास वाढला आहे, असं बाबार आजम म्हणाला.
पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांनी मिळून बांग्लादेशच्या 8 विकेट काढल्या. शाहीन शाह आफ्रिदीला 1, नसीम शाहने 3 आणि हॅरिस रौफने 4 विकेट काढल्या. वेगवान गोलंदाजांमुळे बांग्लादेशचा डाव 38.4 ओव्हर्समध्ये 193 धावांवर आटोपला. विजयासाठी मिळालेलं 194 धावांच लक्ष्य पाकिस्तानने 39 व्या ओव्हरमध्येच पार केलं. “या विजयाच श्रेय संपूर्ण टीमला जातं. खासकरुन पहिल्या 10 ओव्हर्समध्ये शाहीन आणि रौफने कमाल केली. या विजयाने कॉन्फिडेंस वाढला आहे” असं बाबर म्हणाला.
मोठ्या मॅचसाठी पाकिस्तान तयार
‘मी मोठ्या मॅचसाठी नेहमीच तयार असतो’, असं पाकिस्तानी कॅप्टनने म्हटलं आहे. “पुढच्या मॅचमध्ये मी माझ्याकडून 100 टक्के देईन. टीम पूर्णपणे दबावमुक्त आहे. प्रत्येक सामन्यात आम्ही बेस्ट प्रदर्शन करण्याचा प्रयत्न करतोय” अंस बाबर म्हणाला. “लाहोरच्या विकेटवर तुम्ही स्टम्प टू स्टम्प गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करता. यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला नाही. कारण त्याची आवश्यकता नव्हती” असं बाबर आजमने सांगितलं.
पाकिस्तानची ताकत कशामध्ये आहे?
सुपर फोर राऊंडआधी भारत-पाकिस्तानमध्ये पहिला सामना झाला होता. पण पावसामुळे हा सामना रद्द झाला. टीम इंडिया 266 रन्सवर ऑलआऊट झाली होती. शाहीन शाह आफ्रिदीने पहिल्या 10 ओव्हरमध्ये रोहित शर्मा, विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवलं होतं. या मॅचमध्ये पहिल्या 10 ओव्हर खेळून काढताना टीम इंडियाने अडचणीचा सामना केला. पहिल्या 10 ओव्हर्स आपली ताकत आहेत, असं बाबर आजमने सांगितलं.