कोलंबो : आशिया कप स्पर्धेत दमदार कामगिरी करण्याचा पाकिस्तानी टीमला विश्वास होता. पण आशिया कप स्पर्धेपासूनच पाकिस्तानच्या अडचणी वाढत चालल्या आहेत. परंपरागत कट्टर प्रतिस्पर्धी टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारली. टीम इंडियाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला. एकतर्फी सामना झाला, असच या मॅचच वर्णन कराव लागेल. पाकिस्तानला अजिबात डोकं वर काढण्याची संधी मिळाली नाही. त्यानंतर श्रींलेकने पाकिस्तानवर 2 विकेट राखून विजय मिळवला. त्यामुळे पाकिस्तानच आशिया कपच्या फायनलच तिकीट हुकलं. टीम इंडिया विरुद्ध खेळताना पाकिस्तानच्या दोन हुकूमी गोलंदाजांना दुखापत झाली होती. हॅरिस रौफ आणि नसीम शाह या दोन खेळाडूंना दुखापत झाली. त्यामुळे ते काल श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात खेळू शकले नाहीत. आता पाकिस्तानसाठी आणखी एक चिंता वाढवणारी बातमी आहे. वनडे वर्ल्ड कप 2023 आधी पाकिस्तानी टीमसाठी हा एक झटका आहे.
पाकिस्तानचा युवा वेगवान गोलंदाज नसीम शाहच्या उजव्या खांद्याला दुखापत झाली आहे. आशिया कप स्पर्धेत टीम इंडिया विरुद्ध खेळताना नसीम शाहला ही दुखापत झाली होती. नसीम शाहची ही दुखापत गंभीर असल्याची माहिती मिळतेय. नसीम शाह कदाचित वनडे वर्ल्ड कप 2023 च्या सुरुवातीच्या काही सामन्यांना मुकू शकतो. पाकिस्तानचा कॅप्टन बाबर आजमनेच स्वत: तसे संकेत दिले आहेत. यात हाय-प्रोफाईल भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचाही समावेश आहे. म्हणजे ऑक्टोंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत नसीम शाह फिट होण्याची शक्यता नाहीय. 14 ऑक्टोंबरला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे. नसीम शाह दुखापतीमधून कधीपर्यंत बरा होईल? त्याच्या रिकव्हरीच शेड्युल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने जाहीर केलेलं नाही. असं झाल्यास निश्चितच पाकिस्तान क्रिकेट टीमसाठी हा एक मोठा झटका आहे.
पाकिस्तानच्या दुसऱ्या गोलंदाजाच काय?
पुढच्या महिन्यात वर्ल्ड कपच्या सुरुवातीच्या सा्मन्यांमध्ये नसीम शाह खेळू शकतो का? या बद्दल कॅप्टन बाबर आजम स्वत: साशंक आहे. इनसाइड स्पोर्ट्सने हे वृत्त दिलय. हॅरिस रौफच्या बगलेममध्ये दुखापत आहे. पण तो वर्ल्ड कप 2023 पर्यंत निश्चित फिट होईल. कारण पाकिस्तानने अजूनपर्यंत हॅरिस रौफला अधिकृतपण आशिया कप 2023 मधून वगळलेलं नाही.