मुंबई: मोहम्मद रिजवानच्या बळावर पाकिस्तानची टीम आशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचली. रविवारी दुबईच्या स्टेडियममध्ये श्रीलंकेविरुद्ध फायनल मॅच होणार आहे. श्रीलंकेने सुपर 4 च्या शेवटच्या सामन्यात पाकिस्तानवर विजय मिळवला. टुर्नामेंटमध्ये मोहम्मद रिजवानच पाकिस्तानच्या फलंदाजीचा मुख्य आधारस्तंभ आहे. त्याच्यावरच पाकिस्तानची फलंदाजी अवलंबून आहे. या स्पर्धेत त्याची बॅट चालली, तेव्हा पाकिस्तानी टीमने विजय मिळवला. पण त्याच्या बॅटमधून धावा आटल्या, तेव्हा पाकिस्तानचा पराभव झाला.
फायनलआधी आता मोहम्मद रिजवानने एक इंटरेस्टिंग खुलासा केलाय. लहानपणी जेव्हा पाकिस्तानी टीमचा भारताविरोधात सामना व्हायचा, तेव्हा मला भिती वाटायची, असं त्याने सांगितलं.
रिजवान भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा मोठा चाहता आहे. रिजवानला तेंडुलकरची बॅटिंग आवडायची. तेंडुलकर जेव्हा पाकिस्तान विरोधात धावा करायचा, तेव्हा सेलिब्रेशन कसं करायचं? हा प्रश्न लहानग्या रिजवानला पडायचा. फायनलआधी रिजवानने हा खुलास केला. क्रिकबजने हे वृत्त दिलय. सचिन तेंडुलकरने पाकिस्तान विरोधात नेहमीच सरस कामगिरी केलीय. 2003 आणि 2011 साली सचिनमुळे पाकिस्तानचा वर्ल्ड कपमधील पुढचा प्रवास संपुष्टात आला.
आशिया कपमध्ये मोहम्मद रिजवानने एकट्याने पाकिस्तानच्या फलंदाजीचा भार संभाळला. रिजवानच्या फलंदाजीमुळे पाकिस्तानने सुपर 4 मध्ये भारताचा 5 विकेटने पराभव केला. रिजवानने भारताविरुद्ध 71 आणि हाँगकाँग विरुद्ध नाबाद 78 धावा केल्या. ग्रुप स्टेजमध्ये टीम इंडिया विरुद्ध त्याने 43 धावा केल्या होत्या. तो क्रिकेट जगतातील टी 20 मधील नंबर एक फलंदाज आहे. रिजवानने आतापर्यंत 226 धावा केल्या आहेत. आशिया कपमध्ये सर्वाधिक धावा करणारा तो दुसरा फलंदाज आहे. त्याच्याआधी विराट कोहली आहे. रिजवानकडे कोहलीच्या पुढे जाण्याची संधी आहे. त्यासाठी फायनलमध्ये कमीत कमी त्याला 51 रन्स कराव्या लागतील.