केपटाऊन: दक्षिण आफ्रिकेत (south Africa) भारतीय गोलंदाजांचं (Indian pacers) दमदार प्रदर्शन सुरु आहे. पहिल्या कसोटीपासून भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला दबावाखाली ठेवलं आहे. संघाला गरज असताना या पेस बॉलर्सनी विकेट मिळवून दिल्यात. कालही केपटाऊनमध्ये (cape town test) भारताची धावसंख्या कमी असताना या गोलंदाजांनी आपलं काम चोख बजावलं व दक्षिण आफ्रिकेला 210 धावांवर रोखलं. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, उमेश यादव आणि शार्दुल ठाकूरने मिळून 10 विकेट घेतल्या.
त्याच्या एका स्पेलन चित्रच बदललं
बुमराहने सर्वात भेदक मारा केला व निम्मा संघ गारद केला. कसोटी क्रिकेटमध्ये सातव्यांदा त्याने पाच विकेट घेण्याची करामत करुन दाखवली. शमी-उमेशने प्रत्येकी दोन तर ठाकूरने एक विकेट घेतली. बुमराहने दक्षिण आफ्रिकेचं कंबरड मोडलं असलं, तरी शमीच्या एक भन्नाट स्पेलने चित्रच बदलून टाकलं. एका षटकात शमीने टेंबा बावुमा आणि काइल वेरेनेची विकेट घेतली. तीन बाद 112 वरुन दक्षिण आफ्रिकेची अवस्था सहाबाद 159 झाली.
संपूर्ण सीरीजमधला धोकादायक गोलंदाज
शमीच्या स्पेलचे गौतम गंभीरनेही कौतुक केले. त्याची गोलंदाजी पाहून मालिकेतील सर्वात धोकादायक गोलंदाज असल्याचे गंभीरने म्हटले. “मोहम्मद शमी आजच्या दिवसात किंबहुना संपूर्ण मालिकेतलाच धोकादायक गोलंदाज वाटला. त्याने ज्या लेंथने गोलंदाजी केली, ती खेळताना फलंदाजाची परीक्षाच होती. कुठल्याही टॉपच्या फलंदाजाला विचारा, कोणालाही त्याचा सामना करायची इच्छा नसेल” असे गंभीरने बायजू क्रिकेट लाईव्ह शो मध्ये सांगितले.
“मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह कुठल्याही फलंदाजासाठी आव्हानात्मकच आहेत. मोहम्मद शमी खूपच धोकादायक आहे. कसोटी क्रिकेटमधला तो सर्वोत्तम गोलंदाजापैकी एक आहे” अशा शब्दात गंभीरने शमीचे कौतुक केले.