मेलबर्न: ऑस्ट्रेलिया-इंग्लंड दरम्यान (AUS vs ENG) अॅशेस मालिकेतील (Ashes Series) दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. अॅशेस मालिकेला भारत-पाकिस्तान सामन्यासारखंच महत्त्व आहे. अॅशेसची स्वत:ची एक परंपरा आहे. ही मालिका जिंकण्यासाठी दोन्ही संघ जिवाचे रान करतात. मालिकेतील पहिली कसोटी नऊ विकेटने जिंकून ऑस्ट्रेलियाने दमदार सुरुवात केली आहे. आता दुसऱ्या कसोटी सामन्यातही तीच लय कायम राखण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असेल.
ऑस्ट्रेलियाला झटका
अॅडलेड ओव्हलच्या मैदानावर दुसरा कसोटी सामना होत आहे. हा डे-नाईट कसोटी सामना आहे. दुसरी कसोटी सुरु होण्याआधी ऑस्ट्रेलियाला एक झटका बसला. ऑस्ट्रेलियाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स कोविड पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्याने त्याला आयसोलेशन मध्ये जावे लागले आहे. त्याच्याजागी स्टीव स्मिथ ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करत आहे. ट्रेविस हेडला उपकर्णधार बनवण्यात आले आहे. पॅट कमिन्सच्या जागी मायकल नासेरपचा संघात समावेश करण्यात आला आहे.
स्मिथला तीन वर्षानंतर संधी
तीन वर्षानंतर स्मिथला पुन्हा एकदा संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. कमिन्सच्या अनुपस्थितीत खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या डे-नाइट कसोटी सामन्यात पहिल्या दिवसाचा पहिल्या सत्राचा खेळ संपला असून इंग्लिश गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली. पण त्यांना अपेक्षित यश मिळाले नाही. त्यांना फक्त मार्कस हॅरिसला बाद करता आले.
फक्त एक विकेट
स्टुअर्ट ब्रॉडच्या गोलंदाजीवर हॅरिस अवघ्या तीन धावांवर बाद झाला. त्याने बटलरकडे झेल देऊन तंबुची वाट धरली. लाबुशेन आणि डेविड वॉर्नरला इंग्लिश गोलंदाजांनी चांगलेच सतावले. पण दोघांनी खेळपट्टीवर टिकून राहत इंग्लंडला दुसरी विकेट मिळणार नाही, याची काळजी घेतली. पहिल्या सत्राच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाने एक विकेट गमावून ४५ धावा केल्या आहेत. वॉर्नर २० आणि लाबुशेन १६ धावांवर खेळत आहेत. वॉर्नरला २० धावा करण्यासाठी तब्बल ७२ चेंडू खेळावे लागले.
संबंधित बातम्या:
विराट आणि सौरव गांगुलीमध्ये नेमकं खरं कोण बोलतय?
कॉमेट्री बॉक्समध्ये ईशा गुहाच्या डबल मीनिंग गुगलीवर गिलख्रिस्ट क्लीन बोल्ड
Virat kohli press confrence: ‘रोहित आणि माझ्यात कुठलाही प्रॉब्लेम नाही, हे वारंवार सांगून आता मी थकलोय’