सिडनी: ऑस्ट्रेलियाने गाबा टेस्ट फक्त 2 दिवसात जिंकली. कसोटी सामना 5 दिवसांचा असतो. पण 3 दिवस आधीच मॅच संपली. 3 टेस्ट मॅचच्या सीरीजमध्ये यजमान ऑस्ट्रेलिया 1-0 ने आघाडीवर आहे. दक्षिण आफ्रिकेने गाबा टेस्ट जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियासमोर फक्त 34 धावांच लक्ष्य ठेवलं होतं. ऑस्ट्रेलियाने 4 विकेट गमावून हे लक्ष्य पार केलं. एकूणच या कसोटी सामन्याचा निकाल गोलंदाजांनी लावला.
दक्षिण आफ्रिकेच्या बॉलर्सचाही भेदक मारा
ब्रिस्बेनमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पहिली फलंदाजी केली. त्यांचा डाव 152 धावात आटोपला. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव खूप लवकर संपला. ऑस्ट्रेलियाकडे मोठी आघाडी घेण्याची संधी होती. पण ते अपयशी ठरले. कारण दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी सुद्धा तितकीच जबरदस्त बॉलिंग केली.
दुसऱ्याडावातही दक्षिण आफ्रिका ढेपाळली
दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला मोठी आघाडी मिळू दिली नाही. त्यांना 218 धावांवर रोखलं. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांकडून दुसऱ्या डावात चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. पण ते अपयशी ठरले. दक्षिण आफ्रिकेचा दुसरा डाव 99 धावात संपुष्टात आला. त्यांना 100 धावांच्या आत रोखण्यासाठी ऑस्ट्रेलियन कॅप्टन पॅट कमिन्सने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने दुसऱ्या इनिंगमध्ये 5 विकेट घेतल्यात.
छोटं लक्ष्य असूनही ऑस्ट्रेलियाच्या 4 विकेट
ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी फक्त 34 धावांच लक्ष्य होतं. पण या सोप्या लक्ष्याचा पाठगाल करताना त्यांनी 4 फलंदाज गमावले. दक्षिण आफ्रिकेकडून रबाडाने जबरदस्त गोलंदाजी केली. ऑस्ट्रेलियाचे चारही विकेट त्यानेच काढले. दुसऱ्याडावात रबाडाने 4 ओव्हरमध्ये 13 धावा देऊन 4 विकेट काढल्या. ऑस्ट्रेलियाने 6 विकेट राखून हा सामना जिंकला.
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये आता दुसरा कसोटी सामना बॉक्सिंग डे च्या दिवशी होईल. 26 डिसेंबरला मेलबर्नमध्ये हा कसोटी सामना सुरु होईल. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये तीन कसोटी सामन्यांची सीरीज खेळली जाणार आहे.