मुंबई: इंडीयन प्रीमियर लीगच्या पुढच्या सीजनची तयारी जोरात सुरु आहे. सगळ्यांच्याच नजरा पुढच्या महिन्यात होणाऱ्या आयपीएलच्या लिलावाकडे लागल्या आहेत. या लिलावासाठी अनेक खेळाडूंनी रजिस्ट्रेशन केलय. यात भारताशिवाय परदेशी खेळाडू सुद्धा आहेत. यात एक नाव, ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर कॅमरुन ग्रीनच आहे. ग्रीनवर सगळ्याच फ्रेंचायजीच्या नजरा आहेत. पण या लिलावाआधी ऑस्ट्रेलियाचे मुख्य कोच एंड्रयू मॅक्डोनाल्ड यांनी एक विधान केलय. त्यामुळे फ्रेंचायजींच टेन्शन वाढू शकतं.
कॅमरुन ग्रीनबद्दल ऑस्ट्रेलियाचे कोच काय म्हणाले?
ऑस्ट्रेलियाचे मुख्य कोच एंड्रयू मॅक्डोनाल्ड आयपीएलआधी ग्रीनमुळे चिंतेत आहेत. कॅमरुन ग्रीनच्या आयपीएलमध्ये खेळण्याबद्दल ही T20 लीग जवळ आल्यानंतर निर्णय घेतला जाईल. ग्रीन आयसीसी टी 20 वर्ल्ड कपआधी भारत दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन टीमचा भाग होता. या दौऱ्यावर ऑस्ट्रेलियन टीमने तीन टी 20 सामने खेळले. यात ग्रीनने दोन अर्धशतकं फटकावली. ग्रीन आयपीएल खेळणार असेल, तर फ्रेंचायजी त्याच्यावर मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करु शकतात.
“आयपीएलच्याआधी भरपूर क्रिकेट खेळायच आहे. मला विश्वास आहे की, तो आता निर्णय घेणार नाही. आयपीएलच्या आधी यावर निर्णय घेतला जाईल” असं एंड्रयू मॅक्डोनाल्ड यांनी सांगितलं.
पाठदुखीने हैराण
आयपीएल 2023 च्या आधी फेब्रुवारी-मार्चमध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आणि जून-जुलै महिन्यात इंग्लंडमध्ये Ashes सीरीज होणार आहे. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नरने ग्रीनला आधीच त्याच्यावरील जबाबदाऱ्यांची कल्पना दिली आहे. ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट टीमचा कॅप्टन पॅट कमिन्सने आधीच व्यस्त वेळापत्रकामुळे पुढच्यावर्षीच्या आयपीएलमधून माघार घेतली आहे. अलीकडेच ग्रीन पाठदुखीने त्रस्त होता. त्यामुळे त्याच्या गोलंदाजीवर मर्यादा आली.