मेलबर्न: यंदाची टी 20 वर्ल्ड कप (T20 World Cup) स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये होत आहे. ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड (AUS vs NZ) विरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. 22 ऑक्टोबरला सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानावर हा सामना होईल. या मॅचआधी ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढल्या आहेत. टीमचा विकेटकीपर फलंदाज जॉश इंग्लिसला (josh inglis) बेजबाबदारपणा भोवला आहे. त्याला दुखापत झाली आहे. यामुळे विद्यमान चॅम्पियन ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढणार आहेत.
गोल्फ खेळणं इंग्लिसला पडलं भारी
भारताविरुद्ध वॉर्मअप मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव झाला. त्यानंतर बुधवारी ऑस्ट्रेलियन टीमला विश्रांती देण्यात आली. टीमचं या आठवड्यात एक कठीण ट्रेनिंग सेशन होणार आहे. खेळाडूंनी सुट्टीच्या दिवशी गोल्फ खेळण्याचा निर्णय घेतला.
खेळाडू सिडनीच्या न्यू साऊथ वेल्स गोल्फ कोर्स क्लबमध्ये पोहोचले. तिथे शॉट खेळताना इंग्लिसला दुखापत झाली. हाताला कट झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. त्यानंतर इंग्लिसला रुग्णालयात नेण्यात आलं.
दुखापतीबद्दल काही अपडेट नाहीय
इंग्लिसला झालेली दुखापत कितपत गंभीर आहे, त्याबद्दल चित्र अजून स्पष्ट नाहीय. इंग्लिसच्या दुखापतीबद्दल अजून काही सांगता येणार नाही, असं टीमच्या स्पोकपर्सनने सांगितलं. रिपोर्ट्स आल्यानंतरच काही सांगता येईल.
इंग्लिस ऑस्ट्रेलियन टीमचा बॅकअप विकेटकीपर आहेत. 22 तारखेला न्यूझीलंड विरुद्ध मॅथ्यू वेड विकेटकीपिंग करताना दिसेल. वेडला दुखापत झाल्यास जॉश इंग्लिस सुद्धा टीममध्ये नसेल, तर ऑस्ट्रेलियाच्या अडचणी वाढू शकतात.