सिडनी: ऑस्ट्रेलियाने आपल्या टेस्ट टीमची घोषणा केलीय. अजून दौरा सुरु झालेला नाही. मात्र त्याआधीच ऑस्ट्रेलियन टीमला मोठा झटका बसलाय. भारतात येणारी फ्लाइट पकडण्याआधी ऑस्ट्रेलियन टीमसाठी वाईट बातमी आहे. निश्चितच भारतातील ऑस्ट्रेलियाच्या कामगिरीवर याचा परिणाम होऊ शकतो. त्यांच्या भारत दौऱ्याची खराब सुरुवात होऊ शकते. सुरुवात खराब झाली, तर मोहिम फत्ते होणं कठीण असतं. ऑस्ट्रेलिया संदर्भात जी वाईट बातमी आहे, ती वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कच्या इंजरी संदर्भात आहे.
ऑस्ट्रेलियाला काय जिव्हारी लागलय?
टेस्ट सीरीजमधील मागच्या पराभवाचा हिशोब चुकता करण्याच्या इराद्याने ऑस्ट्रेलियन टीम भारत दौऱ्यावर येणार आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात 2 वेळा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये धुळ चारलीय. त्याच पराभवाचा बदला घेणं हे ऑस्ट्रेलियाच लक्ष्य असणार आहे. यात मिचेल स्टार्कची भूमिका महत्त्वाची आहे. पण सध्या तो इंजर्ड आहे.
पहिल्या टेस्टमध्ये हा प्रमुख प्लेयर का नाही खेळणार?
वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क भारताविरुद्ध पहिला कसोटी सामना खेळणार नाही, हे ऑस्ट्रेलियाकडून स्पष्ट करण्यात आलय. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका 9 फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. नागपूरमध्ये पहिला कसोटी सामना होईल. मिचेल स्टार्कच्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे.
दिल्लीत दुसऱ्या कसोटीपासून खेळणार
मेलबर्नमध्ये बॉक्सिंग डे टेस्ट दरम्यान दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना मिचेल स्टार्कला दुखापत झाली होती. तो सिडनीमध्ये तिसऱ्या कसोटी सामन्यातही खेळला नव्हता. स्टार्क दिल्लीत होणाऱ्या दुसऱ्या कसोटीपासून टीमशी जोडला जाईल, असं ऑस्ट्रेलियन सिलेक्शन कमिटीने जाहीर केलय. पहिल्या टेस्ट मॅचमध्ये कॅमरुन ग्रीन टीमसोबत असेल. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सीरीज खेळताना ग्रीनला सुद्धा दुखापत झाली होती. त्यातून तो आता सावरलाय.