एडिलेड: ऑस्ट्रेलियाचा डावखुरा सलामीवीर डेविड वॉर्नर तुफानी इनिंग खेळला. त्या बळावर ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर पहिल्या वनडेमध्ये विजय मिळवला. ऑस्ट्रेलिया-इंग्लंडमध्ये तीन वनडे सामन्यांची सीरीज होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ऑस्ट्रेलियातने जिंकलाय. टी 20 वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाने निराशाजनक प्रदर्शन केलं. त्यानंतर ऑस्ट्रेलियन टीम ट्रॅकवर येण्याचा प्रयत्न करतेय.
टी 20 वर्ल्ड कपआधी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये टी 20 सीरीज झाली. यात इंग्लंडने बाजी मारली होती. आता वनडे मालिका जिंकण्याच्या इराद्याने ऑस्ट्रेलियन टीम मैदानात उतरली आहे.
इंग्लंडने किती धावा केल्या?
एडिलेडमध्ये पहिला वनडे सामना झाला. इंग्लंडने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 50 ओव्हर्समध्ये 9 विकेट गमावून 287 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाने हे लक्ष्य पार केलं.
मलान एकटा खेळला
ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन पॅट कमिन्सने टॉस जिंकून इंग्लंडला फलंदाजीच आमंत्रण दिलं. इंग्लंडची सुरुवात खराब झाली. अवघ्या 20 रन्सवर सलामीवीर तंबूत परतले. त्यानंतर डेविड मलानने डाव संभाळण्याचा प्रयत्न केला. बिलिंग्स, जोस बटलर, लियन डॉसन आणि ख्रिस जॉर्डनसोबत मलानने भागीदारी केली.
फलंदाज ठराविक अंतराने बाद होऊन तंबूत परतत होते. पण मलान दुसऱ्या टोकाला उभा होता. तो 134 धावांची शानदार इनिंग खेळला. त्या बळावर इंग्लंडने 287 धावांचा डोंगर उभारला. ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स आणि एडम झम्पाने प्रत्येकी 3-3 विकेट घेतल्याय.
डेविड वॉर्नरची दमदार फलंदाजी
ऑस्ट्रेलियन टीमला हे लक्ष्य गाठणं कठीण पडलं नाही. टीमचे ओपनर डेविड वॉर्नर आणि ट्रेविस हेड यांनी दमदार सुरुवात दिली. पहिल्या विकेटसाठी 147 धावांची भागीदारी केली. ख्रिस जॉर्डनने ट्रेविस हेडला आऊट करुन ही जोडी तोडली. हेडने 69 धावा केल्या. त्यानंतर स्टीव्ह स्मिथ फलंदाजीसाठी मैदानात आला. त्याने वॉर्नरसोबत 53 धावांची भागीदारी केली. 84 चेंडूत 86 धावा फटकावून वॉर्नर विलीच्या चेंडूवर आऊट झाला. स्टीव्ह स्मिथने नाबाद 80 धावा केल्या. 47 व्या षटकातच ऑस्ट्रेलियाने विजयी लक्ष्य गाठले.