Australia Pull Out Of ODIs vs Afghanistan: ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने अफगाणिस्तानच्या तालिबान शासनाविरोधात कठोर भूमिका घेतली आहे. ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात मार्च 2023 मध्ये होणारी वनडे सीरीज रद्द झाली आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने अफगाणिस्तान सोबत क्रिकेट सीरीज खेळायला नकार दिला आहे. या निर्णयामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच मोठ आर्थिक नुकसान होईल, तरीही ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने हा निर्णय घेतलाय. अफगाणिस्तान विरुद्ध कुठलाही क्रिकेट सामना न खेळण्याचा निर्णय घेतलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अफगाणिस्तानच्या स्थितीबद्दल आधीच चिंता व्यक्त केली होती.
अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने महिलांवर अनेक निर्बंध लादले आहेत. त्यांच्या महिलाविरोधी धोरणांमुळे ऑस्ट्रेलियाने अफगाणिस्तान विरुद्ध क्रिकेट सीरीज न खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
तालिबानच्या ‘या’ निर्णयांना ऑस्ट्रेलियाचा विरोध
तालिबान सरकारने अफगाणिस्तानात महिला आणि मुलींवर विद्यापीठात जाण्यावर, NGO मध्ये काम करण्यावर बंदी घातली आहे. इतकच नाही, अफगाणिस्तानात महिलांना क्रीडा स्पर्धात सहभागी होण्यावर सुद्धा बंदी घातली आहे. अलीकडेच अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने महिलांच्या शिकण्यावर, नोकरी करण्यावर, पार्क, जीम आणि घराबाहेर पडण्यावर बंदी घातली आहे. ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाच्या या निर्णयाच ऑस्ट्रेलियन सरकारने समर्थन केलय. क्रिकेट बोर्डाने सरकारचे आभार मानले.
कधी होणार होती सीरीज?
ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम फेब्रवारी महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियात चार टेस्ट मॅचची सीरीज होणार आहे. तीन वनडे सामने सुद्धा खेळले जातील. या मालिकेनंतर ऑस्ट्रेलिया अफगाणिस्तान विरुद्ध तीन वनडे सामन्यांची सीरीज खेळणार आहे. यूएईमध्ये हे सामने होणार होते. आता ऑस्ट्रेलियाच्या भूमिकेमुळे ही सीरीज रद्द होणार आहे. “क्रिकेट ऑस्ट्रेलिया संपूर्ण विश्वात महिला आणि पुरुषांना पुढे घेऊन जाण्यासाठी कटिबद्ध आहे. आम्ही अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाशी सुद्धा चर्चा करतो, जेणेकरुन अफगाणिस्तानात महिला आणि मुलींच्या स्थितीमध्ये सुधारणा होईल” असं ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने सांगितलं.
ऑस्ट्रेलियाच किती नुकसान?
यूएईमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध होणारी तीन वनडे सामन्यांची सीरीज आयसीसी सुपर लीगचा भाग आहे. ऑस्ट्रेलियाच्या सीरीज रद्द करण्याच्या निर्णयामुळे त्यांना नुकसान सहन कराव लागणार आहे. सीरीज न खेळल्यामुळे थेट 30 पॉइंट अफगाणिस्तानच्या खात्यात जमा होतील.
ऑस्ट्रेलियाने आधीच क्वालिफाय केलय
ऑस्ट्रेलियावर याचा काही परिणाम होणार नाही. कारण भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियाने आधीच क्वालिफाय केलय. अफगाणिस्तान आयसीसीचा असा एकमेव फुल टाइम मेंबर आहे, ज्यांची स्वत:ची महिला क्रिकेट टीम नाहीय. शनिवारपासून महिला टी 20 वर्ल्ड कप सुरु होणार आहे.