चेन्नई : वर्ल्ड कपमध्ये भारताचा पहिला सामना ऑस्ट्रेलिया विरुद्ध 8 ऑक्टोबरला होणार आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर ही मॅच होणार आहे. वर्ल्ड कपआधी टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडे सीरीज खेळली. या मालिकेत टीम इंडियाने 2-1 असा विजय मिळवला. तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला असता, तर तो क्लीन स्वीप ठरला असता. या मालिकेत भारताच्या फिरकी गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना चांगलच सतावलं. खासकरुन आर.अश्विनच्या चेंडूंच ऑस्ट्रेलियन फलंदाजांकडे काहीच उत्तर नव्हतं. मात्र, तरीही ऑस्ट्रेलियन कॅप्टन पॅट कमिन्स भारतीय स्पिन गोलंदाजांना धोकादायक मानत नाही. आमच्याकडे भारतीय स्पिन गोलंदाजीचा सामना करण्याचा प्लान आहे, असं कमिन्सने सांगितलं.
राजकोट वनडेमध्ये टीम इंडियावर विजय मिळवल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावलया असं कमिन्सने सांगितलं. “भारताविरुद्धच्या सामन्याची आमची तयारी सुरु आहे. ऑस्ट्रेलियन फलंदाज स्पिन गोलंदाजीविरुद्ध सराव करतायत. आमच्या अनेक फलंदाजांकडे भारतात खेळण्याचा अनुभव आहे. ते सगळे भारतीय गोलंदाजांची कमतरता आणि गुण जाणतात. त्या दृष्टीने प्लान तयार आहे” असं पॅट कमिन्स म्हणाला. ड्यू फॅक्टरबद्दल बोलताना पॅट कमिन्स म्हणाला की, “वर्ल्ड कपवर दवाचा परिणाम जाणवेल. हे प्रत्येक मॅचच्या ठिकाणावर अवलंबून आहे. टी 20 मध्ये याचा परिणाम जास्त होतो. कारण दुसरी इनिंग सुरु व्हायच्यावेळीच दवाचा परिणाम दिसू लागतो. चेंडू ओला होण्यास सुरुवात होते”
कमिन्सने त्या प्रश्नावर काय उत्तर दिलं?
आयपीएल खेळण्याचा ज्यांच्याकडे अनुभव आहे, अशा खेळाडूंना टीममध्ये ठेवल्यामुळे भारताला मायदेशात खेळण्याचा तितका फायदा मिळणार नाही का? या प्रश्नावर कमिन्स म्हणाला की, “कदाचित थोडसा फायदा कमी होईल. आमच्या टीममधील बऱ्याच प्लेयर्सनी भारतात बरेच सामने खेळले आहेत. आयपीएलचा सुद्धा अनुभव आहे. घरच्या मैदानात आपल्या लोकांसमोर अनुकूल खेळपट्टीवर खेळण्याचे काही फायदे आहेत. पण आम्ही याआधी सुद्धा अशा परिस्थितीचा सामना केलाय. त्यामुळे यावेळी सुद्धा आमच्यासाठी काही वेगळं नसेल. वर्ल्ड कप जिंकण्यासाठी आम्ही आमच्याबाजूने सर्व प्रयत्न करु”