लाहोर: मुल्तान येथे पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये दुसरा कसोटी सामना सुरु आहे. आज कसोटीचा चौथा दिवस असून सामना रंगतदार स्थितीमध्ये आहे. इंग्लंडने पाकिस्तानला विजयासाठी 355 धावांच टार्गेट दिलं आहे. दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडचा डाव 275 धावात आटोपला. पाकिस्तानने लक्ष्याचा पाठलाग करताना चांगली सुरुवात केली. अब्दुल्लाह शफीक आणि मोहम्मद रिजवान यांनी पहिल्या विकेटसाठी 66 धावांची भागीदारी केली. रिजवान जेम्स अँडरसनच्या एका अप्रतिम चेंडूवर बाद झाला. पाठोपाठ कॅप्टन बाबर आजमही लवकर तंबूत परतला.
थेट स्टम्पसचा वेध
दुसऱ्या इनिंगमध्ये पाकिस्तानी क्रिकेट चाहत्यांना बाबर आजमकडून भरपूर अपेक्षा होत्या. त्याने महत्त्वाची भूमिका बजावावी, अशी अपेक्षा होती. पण ओली रॉबिनसनच्या अप्रतिम चेंडूवर बाबरचा खेळ संपला. या टेस्ट मॅचमध्ये रॉबिनसनने बाबरला दोनदा क्लीन बोल्ड केलं. रॉबिनसनचा चेंडू बाहेर जाईल म्हणून बाबरने सोडला. पण चेंडू आतमध्ये आला व थेट स्टम्पसाचा वेध घेतला.
इंग्लंडला किती रन्सची आघाडी?
या कसोटी सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. मुल्तान कसोटीत पहिल्याच दिवशी इंग्लंडचा डाव 281 रन्समध्ये आटोपला. डेब्यु करणाऱ्या अबरार अहमदने इंग्लंडची वाट लावली. त्याने एकाच इनिंगमध्ये इंग्लंडच्या सात विकेट काढल्या. पाकिस्तानची टीम पहिल्या इनिंगमध्ये 202 रन्सवर ऑलआऊट झाली. इंग्लंडला 79 धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावा हॅरी ब्रुकने शानदार शतक ठोकलं. त्या बळावर इंग्लंडने 275 धावा केल्या.
चौथा दिवस, पाकिस्तानला विजयासाठी किती धावा हव्या?
दुसऱ्या डावात पुन्हा एकदा अबरार इंग्लंडवर भारी पडला. त्याने चार विकेट काढल्या. पहिल्या कसोटीत त्याने दोन्ही डावात मिळून एकूण 11 विकेट काढल्या. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत इंग्लंड 1-0 ने आघाडीवर आहे. रावळपिंडी कसोटी सामना इंग्लंडने 74 धावांनी जिंकला होता. आज कसोटीचा चौथा दिवस आहे. पाकिस्तानला विजयासाठी अजूनही 110 पेक्षा जास्त धावांची गरज असून त्यांच्या पाच विकेट शिल्लक आहेत.