मुंबई: टीम इंडियासाठी 2022 हे वर्ष संमिश्र ठरलं. द्विपक्षीय मालिका टीम इंडियाने जिंकल्या. पण टी 20 वर्ल्ड कप सारख्या महत्त्वाच्या स्पर्धेत सेमीफायनलमध्ये आव्हान संपुष्टात आलं. वर्षभर टी 20 वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेऊन टीम इंडियाने मेहनत केली होती. पण सेमीफायनलध्ये इंग्लंडकडून मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागला. आता 2023 मध्ये नव्या दमाने सुरुवात करण्याच टीमसमोर लक्ष्य आहे. पुढच्यावर्षी 50 षटकांची वनडे वर्ल्ड कप स्पर्धा भारतात होणार आहे.
नव्या वर्षात टीम इंडियाची पहिली सीरीज कुठल्या टीम विरुद्ध?
वनडे वर्ल्ड कपआधी टीम इंडिया वेगवेगळ्या मालिका खेळणार आहे. जानेवारी महिन्यात टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध टी 20 सीरीज खेळणार आहे. श्रीलंकेची टीम भारत दौऱ्यावर येणार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी 20 सीरीजसाठी टीम इंडियाला नवीन कर्णधार मिळणार आहे. त्याचवेळी टीम इंडियाचा उपकर्णधार केएल राहुलसाठी कदाचित नव्या वर्षाची सुरुवात चांगली होणार नाही. श्रीलंकेविरुद्धच्या टी 20 सीरीजसाठी केएल राहुलला कदाचित टीममध्ये स्थान मिळणार नाही. इनसाइड स्पोर्ट्ने हे वृत्त दिलय. रोहित शर्माही दुखापतीमुळे या सीरीजमध्ये खेळणार नाही. बांग्लादेश विरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात रोहितला दुखापत झाली होती.
राहुलवरुन हे प्रश्न विचारले जातायत
केएल राहुलला नव्या वर्षात अशी सुरुवात अपेक्षित नसेल. पण 2022 मध्ये त्याचा परफॉर्मन्स खास नाहीय. त्यामुळे त्याला टीममधून डच्चू मिळू शकतो. केएल राहुलचा परफॉर्मन्स नसताना, त्याला टीममध्ये स्थान कसं मिळतं? उपकर्णधार कसं बनवलं जातं? असा प्रश्न क्रिकेट चाहते विचारतायत.
अर्धशतकांचा टीमला किती फायदा?
टी 20 मध्ये केएल राहुलचा संघर्ष दिसून आला. दुसऱ्या टीमनेच ओपनर्स 140 च्या स्ट्राइक रेटने धावा करत होते. त्यावेळी राहुलने 2022 मध्ये 16 सामन्यात 126.53 च्या सरासरीने धावा केल्या. त्याने फक्त सहा अर्धशतक झळकावताना 434 धावा केल्या. राहुलच्या या हाफ सेंच्युरीमुळे टीमला फार मोठा फायदा झाला नाही.