IPL 2025 : जय शाहंसमोर शाहरुख खान कोणासोबत भांडला? BCCI बैठकीत काय घडलं?

| Updated on: Aug 01, 2024 | 8:44 AM

IPL 2025 : आयपीएलचे आतापर्यंत 17 सीजन झालेत. पुढच्या सीजनसाठी मेगा ऑक्शन होऊ शकतं. या ऑक्शनआधी बीसीसीआयने काल एक बैठक बोलवली. यामध्ये फ्रेंचायजी मालक सहभागी झाले होते. कोलकाता नाईट रायडर्सकडून टीमचा मालक शाहरुख खान आला होता. यावेळी त्याची तिथे वादावादी झाली. नेमकं यामागे कारण काय?

IPL 2025 : जय शाहंसमोर शाहरुख खान कोणासोबत भांडला? BCCI बैठकीत काय घडलं?
Shahrukh khan
Follow us on

IPL 2025 च्या सीजनसाठी मेगा ऑक्शन होण्याआधी खेळाडूंसंदर्भात काय नियम असावेत? यासाठी बीसीसीआयने फ्रेंचायजी मालकांशी चर्चा सुरु केली आहे. बुधवारी 31 जुलैला बीसीसीआयने सर्व फ्रेंचायजी मालकांसोबत बैठक घेतली. या मीटिंगमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा प्लेयर रिटेंशनचा होता. म्हणजे मेगा ऑक्शनआधी किती खेळाडूंना रिटेन करता येईल?. फ्रेंचायजींच या मुद्यावर वेगवेगळ मत असल्याची कल्पना होती. बीसीसीआयच्या बैठकीत हे मतभेद प्रखरपणे समोर आले. विद्यमान आयपीए चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्सच्या मालकामध्ये जोरदार वादावादी झाली.

आयपीएलमध्ये सध्या फक्त 4 खेळाडूंना रिटेन करण्याचा नियम आहे. यात 2 परदेशी खेळाडू असतात. लीगचे 17 सीजन झाले आहेत. अनेक फ्रेंचायजी मालकांची इच्छा आहे की, टीमची ओळख बनवण्यासाठी खेळाडूंच्या रिटेंशनची संख्या वाढवावी. त्यामुळे फॅन्स टीमसोबत कायम राहतील. बीसीसीआयने फ्रेंचायजी मालकांसोबत बैठक केली. त्यामागे मुख्य अजेंडा हाच होता.

वादाचं कारण काय?

बुधवारी 31 जुलैला मुंबईत बीसीसीआयच्या मुख्यालयात ही बैठक पार पडली. बीसीसीआयचे अधिकारी, आयपीएल गवर्निंग काउन्सिल आणि फ्रेंचायजी मालक उपस्थित होते. अनेक फ्रेंचायजी मालकांनी खेळाडूंच्या रिटेंशनची संख्या वाढवण्याची मागणी केली, असा रिपोर्टमध्ये दावा करण्यात आलाय. यात कोलकात नाईट रायडर्सचा मालक आणि बॉलिवूड स्टार शाहरुख खान सुद्धा आहे. दुसऱ्याबाजूला पंजाब किंग्सच्या मालकाने यावर आक्षेप घेतला. पंजाबकडून या बैठकीत प्रीति झिंटा नव्हे को-ओनर नेस वाडिया सहभागी झाले होते. बैठकीत शाहरुख सोबत या मुद्यांवरुन त्यांची जोरदार वादवादी झाली असं बोलल जातय.

त्या मालकाच म्हणणं काय?

दोघांमध्ये वाद का झाला? हा मुद्दा आहे. यामागच कारण स्पष्ट आहे. शाहरुखच्या केकेआरने या सीजनमध्ये किताब जिंकला. त्यामुळे टीममधील जास्तीत जास्त खेळाडू आपल्यासोबतच ठेवण्याचा शाहरुखचा प्रयत्न आहे. जेणेकरुन सांघिक भावना अजून मजबूत होईल. दुसऱ्याबाजूला पंजाब किंग्सची टीम मागच्या अनेक सीजनपासून अपयशी ठरतेय. त्यांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये अनेक खेळाडू बदलले. 2-3 खेळाडू सोडल्यास, बहुतांश खेळाडूंना रिलीज केलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंजाबच मत जास्तीत जास्त खेळाडू रिटेन करण्याच्या बाजूने नाहीय.