मुंबई: अखेर ती शक्यता खरी ठरली आहे. टीम इंडियाला T20 वर्ल्ड कपआधी मोठा झटका बसला आहे. टीम इंडियाचा प्रमुख गोलंदाज पुढच्या महिन्यापासून ऑस्ट्रेलियात सुरु होणाऱ्या वर्ल्ड कपला मुकणार आहे. जसप्रीत बुमराह T20 वर्ल्ड कपमधून बाहेर गेलाय. तो वर्ल्ड कपमध्ये खेळू शकणार नाही. जसप्रीत बुमराहला झालेली दुखापत गंभीर आहे. त्याचं बॅक स्ट्रेस फ्रॅक्चर झालय. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध काल पहिला टी 20 सामना झाला. या मॅचसाठी जसप्रीत बुमराहचा टीममध्ये समावेश केला नव्हता.
तो पर्यंत नुकसान झालं होतं
टी 20 वर्ल्ड कप टीममध्ये बुमराहचा समावेश करण्याची घाई नडली. जसप्रीत बुमराहने या मॅचआधी पाठदुखीचा त्रास होत असल्याची तक्रार केली होती. त्यानंतर तात्काळ त्याची सर्व ट्रेनिंग रुटीन बंद करण्यात आली. पण तो पर्यंत नुकसान झालं होतं. ऑपरेशनची गरज नसली, तरी पाठदुखीच्या या त्रासामुळे पुढचे 5-6 महिने त्याला मैदानापासून लांब रहाव लागणार आहे.
दुखापतीनंतर बुमराह किती सामने खेळला?
नुकतच ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी 20 सीरीजच्यावेळी जसप्रीत बुमराहने टीममध्ये कमबॅक केलं होतं. पहिल्या सामन्याच्यावेळी त्याला विश्रांती देण्यात आली. पण नंतर ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दोन टी 20 सामन्यांमध्ये त्याला संधी दिली. त्यात तो विशेष प्रभाव पाडू शकला नव्हता.
बुमराह सध्या कुठे आहे?
जसप्रीत बुमराहला आता रिहॅबच्या प्रोससमधून जावं लागणार आहे. पुढच्या काही आठवड्यात तो NCA मध्ये जाईल. सध्या तो बँगलोरला आहे. तिथे त्याच्या मेडकील टेस्ट सुरु आहेत. त्याच्या वैद्यकीय रिपोर्टची प्रतिक्षा आहे.
रवींद्र जाडेजानंतर वर्ल्ड कप टीमबाहेर गेलेला जसप्रीत बुमराह टीम इंडियाचा दुसरा स्टार प्लेयर आहे. जाडेजाला गुडघ्याची दुखापत झाली होती. त्याच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली.
कधी बुमराहला पाठदुखीचा त्रास झाला?
इंग्लंड विरुद्ध वनडे सीरीजमध्ये जसप्रीत बुमराहला पाठदुखीचा त्रास झाला होता. त्यानंतर दोन महिने तो क्रिकेटच्या मैदानापासून लांब होता. वेस्ट इंडिज विरुद्धची मालिका आणि आशिया कप टुर्नामेंटच्यावेळीही तो टीम बाहेरच होता.
बुमराहला उपचारासाठी कुठे पाठवणार?
वर्ल्ड कप आधी त्याचा फिटनेस तपासण महत्त्वाचं होतं. त्यासाठी त्याला काही सामने खेळवण्यात आले. पण त्यामुळे दुखापत आणखी वाढली. चांगल्या उपचारासाठी बुमराह पुढच्या महिन्यातच लंडनला रवाना होण्याची शक्यता आहे. सर्जरीची गरज पडली, तर त्याला पुढचे 6 महिने क्रिकेटच्या मैदानापासून लांब रहावे लागेल.