मुंबई: मागच्या आठवड्यात टी 20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला. तेव्हापासूनच टीममध्ये बदलाची मागणी सुरु होती. इंग्लंडने टीम इंडियाचा 10 विकेटने पराभव केला होता. BCCI ने आता बदलाच्या दिशेने पहिलं मोठं पाऊल टाकलं आहे. सिलेक्शन कमिटीचे प्रमुख चेतन शर्मा यांच्यासह सगळी निवड समितीच बर्खास्त केली आहे. भारतीय क्रिकेट बोर्डाने याची घोषणा केली आहे.
चेतन शर्मा यांना कधी मुख्य सिलेक्टर बनवण्यात आलं?
सिनियर सिलेक्शन कमिटी पाच सदस्यांची असते. पण मागच्या काही महिन्यापासून सिलेक्शन कमिटीमध्ये फक्त चार सदस्य होते. माजी वेगवान गोलंदाज चेतन शर्मा या कमिटीचे प्रमुख होते. त्यांच्याशिवाय हरविंदर सिंह, सुनील जोशी आणि देबाशिष मोहंती या कमिटीचे सदस्य होते. चेतन शर्मा यांना डिसेंबर 2020 मध्ये मुख्य सिलेक्टर म्हणून नियुक्त करण्यात आलं होतं. त्यांनी सुनील जोशी यांची जागा घेतली होती. चेतन शर्मा यांच्याआधी जोशी मुख्य सिलेक्टर होते.
सलग दोन वर्ल्ड कपमध्ये अपयश
विद्यमान सिलेक्शन कमिटीच्या नेतृत्वात टीम इंडियाने दोन टी 20 वर्ल्ड कप खेळले. मागच्यावर्षी UAE मध्ये टी 20 वर्ल्ड कप झाला. त्यावेळी विराट कोहली कॅप्टन होता. भारतीय टीम त्या वर्ल्ड कपमध्ये सुपर-12 राऊंडमध्येच बाहेर गेली होती. त्यानंतर सिलेक्शन कमिटीने रोहित शर्माला कॅप्टन बनवलं. तो जेतेपदाचा दुष्काळ संपवेल, अशी अपेक्षा होती. पण टीम इंडिया आशिया कपमध्ये अपयशी ठरली. त्यानंतर टी 20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये आव्हान संपुष्टात आलं.
चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखाली सिलेक्शन कमिटीने न्यूझीलंड आणि बांग्लादेश दौऱ्यासाठी शेवटची टीम निवडली होती.
?NEWS?: BCCI invites applications for the position of National Selectors (Senior Men).
Details : https://t.co/inkWOSoMt9
— BCCI (@BCCI) November 18, 2022
नवीन सिलेक्शन कमिटीसाठी अटी काय?
बीसीसीआयने शुक्रवारी नव्या सिलेक्शन कमिटीसाठी अर्ज मागवले आहेत. सर्व 5 सदस्यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आलीय. बीसीसीआयने प्रेस रिलीजमध्ये 28 नोव्हेंबरपर्यंत इच्छुकांना अर्ज करण्यास सांगितलं आहे. बीसीसीआयने सिलेक्शन कमिटीसाठी योग्यता सुद्धा निश्चित केली आहे. बीसीसीआयच्या 3 पैकी एक अट पूर्ण करावी लागेल.
1) कमीत कमी 7 कसोटी सामने खेळणं आवश्यक
2) 30 फर्स्ट क्लास मॅचचा अनुभव आवश्यक
3) 10 वनडे आणि 20 फर्स्ट क्लास मॅचचा अनुभव आवश्यक
त्याशिवाय अर्जदाराने कमीत कमी 5 वर्ष आधी क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली असली पाहिजे.