मुंबई: विराट कोहलीसाठी (Virat Kohli) सध्या संघर्षाचा काळ आहे. त्याच्या बॅटमधून धावा आटल्या आहेत. मागच्या तीन वर्षात तो एकही शतक झळकवू शकलेला नाही. टी 20 असो वनडे किंवा कसोटी विराट कोहली तिन्ही फॉर्मेट मध्ये झगडतोय. एकवेळ विराट कोहलीची सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) बरोबर तुलना केली जायची. विराट सचिनच्या विक्रमांशी बरोबरी करेल, असं बोललं जायच. पण आता त्याच विराटच्या संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. लवकरच विराट कोहली बद्दल निवड समिती एखादा मोठा निर्णय घेऊ शकते. ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप (T 20 World cup) नंतर विराट कोहली क्रिकेटच्या एका फॉर्मेट मधून बाद होऊ शकतो. टी 20 वर्ल्ड कप नंतर विराट टी 20 फॉर्मेट मधून निवृत्ती जाहीर करु शकतो. टी 20 वर्ल्ड कप नंतर निवड समिती आणि बीसीसीआयचे पदाधिकारी या पर्यायावर चर्चा करु शकतात. इनसाइड स्पोर्ट्ने हे वृत्त दिलय.
विराट कोहली भूतकाळातील कामगिरीच्या आधारावर अजूनही संघात स्थान टिकवून आहे. टी 20 मध्ये त्याची खेळण्याची पद्धत फार चालत नाहीय. विराट कोहली 20 किंवा 35 धावा करतोय, पण या धावा 150 च्या स्ट्राइक रेटने होत नाहीयत. रविवारी पाकिस्तान विरुद्ध विराटने 35 धावा 102.94 च्या स्ट्राइक रेटने केल्या. टी 20 क्रिकेट मध्ये कमी चेंडूत जास्त धावा फटकावणारा फलंदाज उपयुक्त ठरतो. ते या फॉर्मेटच समीकरण आहे. विराट कोहली जो पर्यत टी 20 च्या पेसने धावा करत नाही, तो पर्यंत त्याला सूर गवसला असं म्हणता येणार नाही.
मागच्यावर्षी विराटच्या नेतृत्वाखाली टी 20 वर्ल्ड कपच्या साखळी फेरीतच टीम इंडियाचं आव्हान संपुष्टात आला. विराटला वनडे आणि कसोटी संघाच्या कर्णधारपदावरुन हटवण्यात आलं. कॅप्टनशिपच्या जबाबदारीच ओझं उतरल्यामुळे तो बिनधास्त खेळ दाखवेल, धावा करेल असा अनेकांचा होरा होता. पण तो चुकला. विराटचा धावांसाठी संघर्ष सुरुच आहे. अजून एक-दोन महिने हे असंच सुरु राहिलं, तर निवड समितीने विराट बद्दल मोठा निर्णय घ्यायला अजिबात कचरणार नाही, तसे संकेत सुद्धा दिले जात आहेत. टी 20 क्रिकेट मध्ये मागच्या पाच डावात विराटने 17, 52, 1, 11 आणि 35 धावा केल्या.