मुंबई : महेंद्रसिंग धोनी…. कोणत्याही कठीण परिस्थितीत शांत डोक्याने प्रतिस्पर्धी संघांचा करेक्ट कार्यक्रम कसा करायचा याचं नियोजन करण्यात माहिर… अनेक मातब्बर संघांनी त्याच्या करेक्ट कार्यक्रमाचा अनुभव घेतलाय… अगोदर कसोटी क्रिकेटमधून निवृत्त घेतलेल्या धोनीने भारताच्या 74 व्या स्वातंत्रदिनी क्रिकेटच्या सगळ्या फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली… ‘तो कधीतरी पुन्हा येईल’ अशी अपेक्षा अनेकांना होती… अखेर तो पुन्हा आलाय… भारतीय संघात त्याचं कमबॅक झालंय… टी ट्वेन्टी वर्ल्डकपसाठी बीसीसीआयने धोनीची भारतीय संघाच्या मेन्टॉरपदी नियुक्ती केलीय. पण धोनीच्या निवडीमागे काय कारण होतं? हे पहिल्यांदाच बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे, किंबहुना पहिल्यांदाच जाहीर खुलासा केला आहे.
बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धूमल यांनी धोनीच्या निवडीपाठीमागचं गणित समजावून सांगितलं. धोनीच्या उपस्थितीमुळे भारतीय संघासा निश्चित मोठा फायदा होईल. धोनी एक महान कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 टी ट्वेन्टी वर्ल्ड कप, 2010 आणि 2016 चा एशिया कप, 2011 चा एकदिवसीय वर्ल्डकप, 2013 ची चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. धोनीचा रेकॉर्ड अद्भुत आहे. धोनी भारतीय संघाचा मेन्टॉर असण्याने संघाला खूप मोठा फायदा होईल, तो येणाऱ्या काळात लवकरच स्पष्ट होईल, असा मोठा खुलासा बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धूमल यांनी पहिल्यांदाच जाहीररित्या केला.
बीसीसीआयला आशा आहे की धोनीने भारतीय संघाचं नशीब बदलावं. धोनीने ज्या प्रकारे 2007 टी -20 विश्वचषक आणि 2011 च्या आयसीसी वनडे वर्ल्डमध्ये टीम इंडियाला चॅम्पियन बनवलं अगदी त्याच प्रकारे त्याने आताही टी ट्वेन्टी वर्ल्डकपमध्ये मोठी भूमिका निभावून संघाला विश्वचषक जिंकवून देण्यास सिंहाचा वाटा उचलावा. भलेही विराट कोहली मैदानावर टीम इंडियाचं नेतृत्व करेल पण धोनी सामन्याचा प्लॅन करेल, रणनिती आखेल. मैदानाबाहेरुन धोनी टीम इंडियाचा यशाचा कानमंत्र देईल. धोनीच्या रणनीतीमुळे भारताला टी -20 विश्वचषक जिंकण्याची उत्तम संधी असेल, अशी अनेकांना खात्री वाटते.
विराट कोहलीच्या कर्णधारपदासंदर्भात सर्वात मोठी अडचण अशी आहे की, कर्णधार झाल्यानंतर तो भारतासाठी एकही मोठी स्पर्धा जिंकू शकला नाही. कोहलीच्या नेतृत्वाखाली 2017 च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताचा पाकिस्तानकडून पराभव झाला. त्यानंतर 2019 च्या विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने भारताचा पराभव केल्याने भारताचं विश्वविजेता बनण्याचं स्वप्न भंगलं. यानंतर, विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये देखील भारताला जेतेपद मिळू शकलं नाही. म्हणजेच विराटने आतापर्यंत भारताला एकही आयसीसी ट्रॉफी मिळवून दिलेली नाही. विराटचा आतापर्यंतचा इतिहास बघता धोनीला मेन्टॉर करुन बीसीसीआयने एक मोठी चाल खेळली आहे. विराटला हा एकप्रकारे इशारा असल्याचं देखील काही जणांचं म्हणणं आहे.
हे ही वाचा :
DC vs KKR: केकेआरच्या व्यंकटेशची अष्टपैलू खेळी, आयपीएलमधील खास रेकॉर्डचा मानकरी
IPL 2021: कुंग-फू पंड्याच्या धमाकेदार खेळीची झलक, मुंबईचा 6 विकेट्सनी पंजाबवर विजय!