नवी दिल्ली: भारत आणि पाकिस्तानमध्ये आधीपासूनच बिघडलेले क्रिकेट संबंध आता आणखी खराब होण्याची शक्यता आहे. पुढच्यावर्षी आशिया कप आणि वर्ल्ड कप स्पर्धा होणार आहे. त्या निमित्ताने बीसीसीआय आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड परस्परांवर तिखट हल्ले करत आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष रमीज राजा यांनी वर्ल्ड कपसाठी भारतात न येण्याची धमकी दिली आहे. त्यावर केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी सणसणीत उत्तर दिलं आहे. वेळ आल्यावर सगळं समजेल, असं त्यांनी म्हटलं आहे.
पीसीबीने काय धमकी दिली?
बीसीसीआय सचिव जय शाह यांनी मागच्या महिन्यात एक विधान केलं होतं. आशिया कपसाठी टीम इंडियाला पाकिस्तानात पाठवणार नाही. त्याऐवजी तटस्थ ठिकाणी ही स्पर्धा आयोजित करावी. त्यावेळी पीसीबीने बीसीसीआयला धमकी देण्याचा प्रयत्न केला. असं झाल्यास, पुढच्यावर्षी वर्ल्ड कप खेळण्यासाठी पाकिस्तानची टीम भारतात येणार नाही, अशी पीसीबीने धमकी दिली.
अनुराग ठाकूर काय म्हणाले?
आता पुन्हा एकदा पीसीबी अध्यक्ष रमीज राजा यांनी हा विषय़ छेडला आहे. पाकिस्तानची टीम वर्ल्ड कप खेळण्यासाठी भारतात जाणार नसेल, तर कोणीही ही स्पर्धा पाहणार नाही. पीसीबीच्या या पोकळ धमकीवर BCCI चे माजी अध्यक्ष आणि केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी थेट उत्तर दिलं आहे.
“योग्य वेळेची प्रतिक्षा करा. भारत क्रीडा विश्वात एक मोठी ताकत आहे. कुठलाही देश भारताकडे दुर्लक्ष करु शकत नाही” असं अनुराग ठाकूर यांच्या हवाल्याने एएनआयने म्हटलं आहे.
वनडे वर्ल्ड कपमध्येही भारत-पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये
अलीकडेच रमीज राजा यांनी एका पाकिस्तानी मीडियाला मुलाखत दिली. त्यावेळी ते म्हणाले की, “पुढच्यावर्षी भारतीय टीम आशिया कपसाठी पाकिस्तानात आली नाही, तर ते सुद्धा आपला संघ वर्ल्ड कपसाठी भारतात पाठवणार नाहीत. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड या मुद्यावर आक्रमक भूमिका घेईल. सध्या पाकिस्तानी टीम चांगल प्रदर्शन करत आहे. पाकिस्तानी टीम वर्ल्ड कपमध्ये खेळणार नसेल, तर कोणी सुद्धा ही स्पर्धा पाहणार नाही” टी 20 वर्ल्ड कप प्रमाणे पुढच्यावर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपमध्ये भारत-पाकिस्तानच्या टीम्स एकाच ग्रुपमध्ये आहेत.