सिडनी: ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीगमध्ये काही चांगले क्रिकेट सामने पहायला मिळतात. या लीगमध्ये धावा बनवणं, इतकं सोपं नसतं. याचं कारण आहे, ऑस्ट्रेलियातील मैदानं. ऑस्ट्रेलियात मोठमोठी मैदानं आहेत. इथे चेंडूला सीमारेषेपर्यंत पोहोचवणं सोपं नाहीय. पण एक फलंदाज अपवाद ठरला. बिग बॅश लीगमधील एका सामन्यात त्याने अप्रतिम सिक्स मारला. त्याने अत्यंत सहजतेने लांबलचक षटकार खेचला. चेंडू थेट स्टेडियमच्या छतावर पोहोचवला. बीबीएलमध्ये सोमवारी मेलबर्न स्टार्स आणि सिडनी सिक्सर्समध्ये सामना खेळला गेला. मेलबर्नच्या एका फलंदाजाने चेंडू स्टेडियमच्या छपरावर पोहोचवला.
कोणी दमदार फलंदाजी केली?
सिडनी टीमचा कॅप्टन मोइजेज हेनरिक्सने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. सिडनी क्रिकेट ग्राऊंडच्या मैदानात हा सामना झाला. मेलबर्न टीमने पहिली बॅटिंग केली. त्यांनी निर्धारित 20 ओव्हर्समध्ये पाच विकेट गमावून 150 धावा केल्या. बेयु वेबस्टरच्या फलंदाजीमुळे मेलबर्नची धावसंख्या 150 पर्यंत पोहोचली.
डीप मिडविकेटला सिक्स
वेबस्टर या सामन्यात अर्धशतकी इनिंग खेळला. त्याने एक असा षटकार खेचला की, चेंडू थेट स्टँडच्या छतावर गेला. सामन्यातील 13 वी ओव्हर टाकणाऱ्या हेडन केरने पहिलाच चेंडू पायावर टाकला. वेबस्टरने या बॉलवर फिल्क करुन डीप मिडविकेटला षटकार खेचला. हा साधासुधा सिक्स नव्हता. चेंडू फक्त सीमारेषेपारच गेला नाही, तर बिल ओ रेली स्टँडच्या छतावर गेला. वेबस्टरने या सामन्यात 51 चेंडूंचा सामना केला. त्याने चार चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 78 धावा केल्या. मेलबर्न टीमकडून त्यानेच सर्वाधिक धावा फटकावल्या.
Beau Webster hits a HUGE ball!
He’s bounced that one off the Bill O’Reilly Stand roof ? #BBL12 pic.twitter.com/D4v9xKmnbH
— KFC Big Bash League (@BBL) December 26, 2022
कोणाचीही बॅट चालली नाही
त्याच्याशिवाय मेलबर्न टीमकडून कोणही मैदानावर फार काळ टिकलं नाही. त्याच्यानंतर जो क्लार्कने सर्वाधिक धावा केल्या. क्लार्कने 27 रन्स केल्या. हिल्टन कार्टराइटने 20 चेंडूत 20 रन्स केल्या. निको लार्किनने 12 धावा केल्या.