यावर्षाच्या अखेरीस आयपीएलच मेगा ऑक्शन पार पडणार आहे. मागच्या काही दिवसांपासून त्या बद्दल विविध चर्चा सुरु आहेत. फ्रेंचायजीना किती खेळाडूंना रिटेन करण्याची जबाबदारी मिळणार? हे जाणून घेण्यास क्रिकेटप्रेमी उत्सुक आहेत. त्यानंतरच रोहित शर्मा आणि एमएस धोनी हे दिग्गज खेळाडू आपल्या टीमसोबत राहणार की नाही हे स्पष्ट होईल. रोहित शर्मा मुंबई इंडियन्सची साथ सोडणार अशी चर्चा आहे. असं होणार की नाही हे पुढच्या काही महिन्यात कळेलच. त्याच्याआधी टीम मॅनेजमेंटचा भाग असलेला झहीर खान मुंबई इंडियन्सची साथ सोडू शकतो.
पुढच्या सीजनआधी झहीर खान मुंबई इंडियन्स सोबतचा आपला प्रवास थांबवू शकतो, असा एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे. झहीर बऱ्याच वर्षांपासून मुंबई इंडियन्स टीम मॅनेजमेंटचा भाग आहे. बॉलिंग कोच नंतर तो डायरेक्टर ऑफ क्रिकेटच्या पदावर होता. त्यानंतर 2022 साली मुंबई इंडियन्सने झहीरला प्लेयर्स डेवलपमेंटच ग्लोबल हेड बनवलं. या जबाबदारी अंतर्गत झहीर मुंबई इंडियन्सच्या अन्य T20 टीममधील खेळाडूंना घडवत होता. दोन वर्ष ही जबाबदारी संभाळल्यानंतर झहीर आता वेगळा होऊ शकतो. टीम इंडियाचा विद्यमान कोच गौतम गंभीरच्या जुन्या फ्रेंचायजीकडे झहीर खान जाऊ शकतो.
या टीमकडे सध्या मेंटॉर नाहीय
आयपीएलमधील नवीन फ्रेंचायजी लखनऊ सुपर जायंट्समध्ये झहीर खान दाखल होऊ शकतो. क्रिकबजच्या रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आलाय. झहीर आणि फ्रेंयाचजीमध्ये मेंटॉरच्या रोलसाठी बोलणी सुरु आहेत. 2022 पासून आयपीएल खेळणाऱ्या लखनऊ संघाकडे सध्या मार्गदर्शक नाहीय. पहिल्या दोन सीजनमध्ये गौतम गंभीर या टीमचा मेंटॉर होता. मागच्या सीजनमध्ये गंभीर केकेआरकडे गेला. रिपोर्टनुसार झहीर खान LSG टीमचा फक्त मेंटॉरचा नसेल, तर गोलंदाजी कोचची जबाबदारी त्याच्याकडे असेल. योगायोग असा आहे की, लखनऊ टीमचा बॉलिंग कोच मॉर्ने मॉर्केल आता टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफचा भाग असेल. गंभीरमुळेच मॉर्केलला ही जबाबदारी मिळाली आहे.
चित्र लवकरच स्पष्ट होईल
लखनऊच्या टीमने मागच्या सीजनमध्ये आपल्या कोचिंग सेटअपमध्ये मोठा बदल केला होता. गंभीरशिवाय हेड कोच एंडी फ्लॉवर सुद्धा टीमची साथ सोडून निघून गेले. त्यानंतर जस्टिन लँगरने टीमची जबाबदारी संभाळली. त्याच्यासोबत वोग्स आणि लान्स क्लूजनर सुद्धा सपोर्ट स्टाफमध्ये आले. जॉन्टी रोड्स आधीपासून टीमचा भाग होता. आता झहीर खान पुढच्या सीजनमध्ये LSG टीमसोबत दिसणार की नाही? ते लवकरच स्पष्ट होईल.