लंडन : क्रिकेटविश्वाचं लक्ष लागलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड (India vs England test series) यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होण्यासाठी आता केवळ 4 दिवस राहिले आहेत. मात्र त्याआधीच इंग्लंडला मोठा धक्का बसला आहे. कारण इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सने (Ben Stokes) अनिश्चित काळासाठी क्रिकेटमधून ब्रेक घेतला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (England Cricket Board) याबाबतची माहिती दिली. येत्या 4 ऑगस्टपासून भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे.
बेन स्टोक्सने अचानक क्रिकेट मालिकेतून नाव माघार तर घेतलंच, पण अनिश्चित काळासाठी ब्रेक घेत असल्याचं त्याने म्हटलं आहे. त्यामुळे क्रिकेटविश्वात तर्कवितर्क लढवले जात आहेत. मानसिक स्वास्थ्य आणि बोटाला झालेली दुखापत यामुळेही स्टोक्सने क्रिकेटमधून विश्रांती घेतल्याची चर्चा आहे. यंदा आयपीएल 2021 दरम्यान स्टोक्सच्या बोटाला दुखापत झाली होती. कॅच घेताना त्याच्या बोटाला फ्रॅक्चर झालं होतं.
दरम्या, इंग्लंड बोर्डाने जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय की, बेन स्टोक्सने भारताविरुद्ध पुढील आठवड्यात सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेतून आपलं नाव मागे घेतलं आहे. आपल्या मानसिक आरोग्याची काळजी तो घेत आहे. शिवाय त्याच्या बोटालाही दुखापत झाली आहे. आम्ही त्याच्या या निर्णयाचा आदर करतो”
दरम्यान, भारताविरुद्ध होणाऱ्या पहिल्या दोन कसोटी मालिकेसाठी इंग्लंडने बेन स्टोक्सच्या जागी क्रेग ओव्हरटनचा संघात समावेश केला आहे. ज्या 17 जणांचा संघ जाहीर केला होता, त्यामध्ये स्टोक्सचा समावेश होता. आता त्याच्या जागी क्रेग ओव्हटरनचा समावेश करण्यात आला आहे.