मुंबई: इंग्लंड विरुद्धच्या (Ind vs Eng) पाचव्या कसोटी सामन्याआधी टीम इंडियाला झटका बसला आहे. रोहित शर्मा 1 जुलैपासून सुरु होणाऱ्या कसोटी सामन्यात खेळू शकणार नाहीय. त्याच्याजागी जसप्रीत बुमराह संघाच नेतृत्व करणार आहे. संघ व्यवस्थापनाची नुकतीच एजबॅस्टनच्या मैदानात मीटिंग झाली. तिथूनच हा निर्णय आला आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) पाचव्या कसोटीसाठी उपलब्ध नाहीय, हे जसप्रीत बुमराह (Jasprit bumrah) आणि टीम मधील अन्य सहकाऱ्यांना अधिकृतपणे कळवण्यात आलय. इनसाइड स्पोर्टने हे वृत्त दिलं आहे. भारत या कसोटी मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. भारताकडे तब्बल 15 वर्षांनी इंग्लंड मध्ये कसोटी मालिका जिंकण्याची संधी आहे. मागच्यावर्षी कोविडमुळे अखेरचा कसोटी सामना रद्द झाला होता. तोच कसोटी सामना 1 जुलैपासून खेळला जाणार आहे. रोहित शर्माला सराव सामन्याच्या तिसऱ्यादिवशी कोविडची बाधा झाली होती.
रोहित शर्माची आज पुन्हा कोरोना चाचणी झाली का? त्याचा रिपोर्ट काय आला? त्या बद्दल अजूनही अस्पष्टता आहे. पण रोहित अजूनही आयसोलेशनमध्ये असल्याची माहिती आहे. रोहित शर्माला कोरोना झाल्यामुळे मयंक अग्रवालला तातडीने इंग्लंडला रवाना करण्यात आलं. कारण रोहित शर्मा खेळला नाही, तर फक्त कॅप्टनशिपचाच नाही, सलामीच्या जागेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो.
निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा आज इंग्लंडमध्ये पोहोचणार आहेत. रोहित संदर्भात हेड कोच राहुल द्रविड आणि त्यांच्यामध्ये चर्चा झाली होती. उपकर्णधार केएल राहुलही या सीरीजमध्ये खेळत नाहीय. ग्रोइनच्या दुखापतीवर उपचार घेण्यासाठी तो जर्मनीला गेला आहे.
कोरोनाचा धोका लक्षात घेऊन बीसीसीआयने आधीच खेळाडूंना खबरदारी घेण्याचं आवाहन केलं होतं. इंग्लंड दौऱ्यावर गेलेले खेळाडू बाजारात फिरताना दिसले होते. त्यांनी तोंडाला मास्कही लावला नव्हता. रोहितला कोरोना झाल्यानंतरही संघातील अन्य खेळाडू तितके गंभीर दिसलेले नाहीत.