मुंबई: इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या टीममध्ये द ओव्हल मैदानावर तिसरी टेस्ट मॅच सुरु आहे. काल या कसोटी सामन्याचा तिसरा दिवस होता. इंग्लंडकडे सध्या 36 धावांची छोटी आघाडी आहे. यजमान इंग्लंडने सात विकेट गमावून 154 धावा केल्या आहेत. कालच्या दिवसाच्या खेळात दोन्ही बाजूच्या गोलंदाजांनी अक्षरक्ष: धुमाकूळ घातला. आधी इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेच्या टीमला 118 धावांवर ऑलआऊट केलं. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी सुद्धा तितकीच धारदार गोलंदाजी केली. तिसऱ्यादिवशी एकूण 17 विकेट पडल्या.
इंग्लंडचे फलंदाज कसेबसे दक्षिण आफ्रिकेच्या धावसंख्येच्या पुढे जाण्यात यशस्वी ठरले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला, त्यावेळी बेन फोक्स आणि ऑली रॉबिन्सन खेळपट्टीवर होते. या कसोटीचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. दुसऱ्यादिवसाचा खेळ महाराणी एलिझाबेथ द्वितीयच्या निधनामुळे रद्द करण्यात आला. तिसऱ्यादिवशी दोन्ही टीम्सच्या खेळाडूंनी राणीच्या सन्मानार्थ दंडावर काळीपट्टी बांधली व एक मिनिटाचे मौन राखले.
Five wickets for Ollie Robinson, South Africa bowled out for 118. pic.twitter.com/Jcbx1cgj6u
— England Cricket (@englandcricket) September 10, 2022
ओली रॉबिनसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांनी भेदक मारा केल्या. त्यांच्या गोलंदाजीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 36.2 ओव्हर्समध्ये 118 धावात आटोपला. रॉबिनसनने 49 धावात 5 विकेट आणि ब्रॉडने 41 धावात 4 विकेट घेतल्या.
द ओव्हलची खेळपट्टी फलंदाजीसाठी खूपच कठीण होती. फलंदाजांना तिथे पाय रोवून फलंदाजी करणं अवघड होतं. त्याच विकेटवर इंग्लंडच्या ऑली पोपने अर्धशतक झळकावलं. त्याने 77 चेंडूत 67 धावा केल्या. यात 13 चौकार आहेत. इंग्लंडला 17 धावांवर पहिला धक्का बसला. एलेक्स लीस 13 रन्सवर आऊट झाला. जॅक क्रॉलने 5 धावा केल्या. माजी कॅप्टन जो रुटने पोपला साथ देण्याचा प्रयत्न केला. पण रुट व्यक्तीगत 23 धावांवर बाद झाला. हॅरी ब्रूकने 12 धावांच योगदान दिलं. कॅप्टन बेन स्टोक्सने फक्त 6 धावा केल्या. स्टुअर्ट ब्रॉडही सहा धावांवर आऊट झाला. दक्षिण आफ्रिकेसाठी जॅनसेनने चार आणि कागिसो रबाडाने दोन विकेट घेतल्या. एनरिख नॉर्खियाला एक विकेट मिळाला.