पनवेल: क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. या खेळात कधीही, काहीही होऊ शकतं. सध्याच्या काळात क्रिकेट हा फलंदाजांचा खेळ मानला जातो. म्हणजे फलंदाजांना जास्त संधी असते. पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये सुरु असलेला कसोटी सामना त्याचं उत्तम उदहारण आहे. या कसोटीच्या पहिल्याच दिवशी 500 पेक्षा जास्त धावा झाल्या. काही दिवसांपूर्वी ऋतुराज गायकवाडने विजय हजारे ट्रॉफीमध्ये एका ओव्हरमध्ये 7 सिक्स मारले होते. पण गोलंदाजीत असा काही विक्रम झाल्याच कधी ऐकायला मिळत नाही, की, गोलंदाजाने एकाच ओव्हरमध्ये सर्व चेंडूंवर विकेट घेतले.
कुठे झाला असा कारनामा?
सहा चेंडूत, सहा विकेट असं आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घडलेलं नाही. पण महाराष्ट्रात एका टेनिस बॉल टुर्नामेंटमध्ये असं घडलय. पनवेलमध्ये एका टेनिस बॉल टुर्नामेंटमध्ये एका बॉलरने 6 चेंडूत 6 विकेट घेतले.
पहिल्याच ओव्हरमध्ये कमाल
पनवेलच्या उसळरी खुर्दमध्ये गावदेवी उसाराय चष्क 2022 स्पर्धा सुरु आहे. या टुर्नामेंटमध्ये लक्ष्मण नावाच्या एका गोलंदाजाने एका ओव्हरमध्ये 6 चेंडूत 6 विकेट घेतले. डोंड्राचापडा आणि गावदेवी पेठमध्ये हा सामना होता. डोंड्राचापडाला विजयासाठी 43 धावांची गरज होती. पण पहिल्याच षटकात त्याने सहा फलंदाज तंबूत परतले. लक्ष्मणने पाचव्या चेंडूवर बोल्ड करुन पाचवा विकेट घेतला. सहावा विकेट एलबीडब्ल्यू होता.
यापूर्वी कुठल्या देशात असं घडलय?
एखाद्या गोलंदाजाने सहा चेंडूत सहा विकेट घेण्याची ही पहिली वेळ नाहीय. याआधी ऑस्ट्रेलियात एका स्थानिक मॅचमध्ये असा कारनामा झालाय. 26 जानेवारी 2017 रोजी इंडियन एक्स्प्रेसच्या वेबसाइटवर या संबंधी वृत्त प्रसिद्ध झालं होतं. एलेड कॅरीने अशी कामगिरी करुन दाखवली होती. त्याने गोल्डन पॉइंट क्रिकेट क्लबकडून खेळताना ईस्टर्न बालाराट विरुद्ध 6 चेंडूत 6 विकेट घेण्याची कामगिरी करुन दाखवली होती.
Incredible: 6 wickets in an over! I do not know any other instance in any form of cricket pic.twitter.com/rsYwmBhCs0
— Sarang Bhalerao (@bhaleraosarang) December 2, 2022
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रेकॉर्ड काय आहे?
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अजूनपर्यंत असं झालेलं नाही. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त एका ओव्हरमध्ये चार विकेट पडल्या आहेत.