मुंबई: दुखापतीमुळे संपला म्हणणाऱ्यांना, हार्दिक पंड्याने (Hardik pandya) तो काय चीज आहे ते दाखवून दिलं. आयपीएल 2022 पासून हार्दिक पंड्या सुपर फॉर्म मध्ये आहे. पदार्पणातच त्याने गुजरात टायटन्स (Gujarat Titans) सारख्या नवख्या संघाला आयपीएलच विजेतेपद मिळवून दिलं. आयपीएलच्या आधी कॅप्टन म्हणून कोणी हार्दिकचा विचारही करत नव्हतं. पण आयपीएल मध्ये त्याने आपल्यातील नेतृत्व कौशल्य दाखवून दिलं. आज टीम इंडियाच्या (Team India) उपकर्णधारपदासाठी हार्दिक पंड्याच नाव चर्चेत आहे. भविष्यातील कॅप्टन म्हणूनही त्याच्याकडे पाहिलं जातय. आयपीएल नंतर टीम इंडियाकडून खेळतानाही हार्दिकचा परफॉर्मन्स कायम आहे. उलट त्याची कामगिरी आणखी बहरली. क्रिकेटच्या पीचवर चौकार, षटकार मारणाऱ्या हार्दिकची आता व्यावसायिक पीचवरही तशीच बॅटिग सुरु होणार आहे. राइज स्पोर्ट्स ही कंपनी पंड्याची ब्रँड मॅनेजर आहे. या कंपनीने पंड्याच्या आर्थिक प्रगतीबद्दल माहिती दिली आहे.
राइज स्पोर्ट्सनुसार, 6 ते 7 मोठे ब्रँड हार्दिकला करारबद्ध करण्यासाठी रांगेत उभे आहेत. पंड्याने त्याच्या जाहीरात फी मध्ये सुद्धा मोठी घसघशीत वाढ केली आहे. आता एका ब्रँडच्या जाहीरातीसाठी हार्दिक दिवसाला जवळपास 2 कोटी रुपये चार्ज करतो. मैदानावरच्या सुपर परफॉर्मन्समुळे हार्दिकची ब्रँड व्हॅल्यु 30 ते 40 टक्क्यांनी वाढली आहे. हार्दिक ब्रँड बरोबर करार करताना, त्यांच्याकडून दोन दिवसांची कमिटमेंट घेतो. म्हणजे प्रति ब्रँड कमीत कमी त्याला दोन दिवसात 4 कोटी रुपये मिळतात. इनसाइड स्पोर्ट्ने हे वृत्त दिलय.
हार्दिक सध्या 8 ते 10 ब्रँडची जाहीरात करतोय. लवकरच त्या मध्ये आणखी 5 ते 6 ब्रँड वाढणार आहेत. सोशल मीडियावर हार्दिक कुठलही प्रमोशन करतो, त्यावेळी प्रतिपोस्ट 40 लाख रुपये घेतो. विराट कोहली आणि रोहित शर्मानंतर सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोइंग असलेला हार्दिक पंड्या तिसरा क्रिकेटपटू आहे.
मैदानावर क्रिकेटपटुची कामगिरी बहरते, त्यावेळी मोठे ब्रँडही जाहीरातीसाठी त्याला करारबद्ध करतात. सचिन तेंडुलकर, एमएस धोनी, विराट कोहली आणि रोहित शर्मा हे जाहीरात विश्वातील लोकप्रिय चेहरे होते. आता हार्दिक पंड्याची हवा आहे. मैदानावर त्याची कामगिरी जितकी उत्तम होईल, त्याच्या संपत्ती मध्ये तितकीच भर पडताना दिसेल.